केज: शेतकरी वर्गाला संघर्षमुक्त करण्यासाठी गावपातळीवर सरपंच पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक आणि प्रतिष्ठित नागरिक यांची लोकचळवळ उभारुन शेतातून जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न तडजोडीने सोडविण्यासाठी लोकचळवळ मोहीम राबविण्याचा निर्णय केज येथील तहसीलदार शरद झाडके यांनी घेतला आहे. तालुक्यात १२२ गावे त्यापैकी ११३ ग्रामपंचायती आहेत. पावसाळ्याच्या दिवसात शेताच्या बांधावरुन जाणाऱ्या पाऊलवाटासाठी शेतकऱ्यांमधील संघर्ष विकोपाला जातो. त्यातून गटबाजीला उधाण येणे, हाणामारी, पोलिसात तक्रार, न्यायालयीन वार असे प्रकार वाढतात व गाव पातळीवरील शांततेचा भंग होतो. असे प्रकार केज तालुक्यात होऊ नयेत यासाठी केज येथील तहसीलदार शरद झाडके यांनी सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची एक गाव पातळीवर लोकचळवळ उभारण्याचा संकल्प केला आहे.ही लोकचळवळ प्रत्येक गावातील वादग्रस्त नंबर बांध रस्ते, पांदण रस्ते आणि शेतातून जाणारे इतर रस्ते यांच्यामुळे शेतकऱ्यात होणारा संघर्ष टाळून गावातील एकोप्याचे वातावरण कायम राहावे यासाठी प्रत्येक गावात लोकचळवळ उभारण्याच्याकामला गती आली आहे. लोकचळवळ गावातील प्रश्न गावपातळीवर चावडीवर किंवा मंदिरात बसून विचार विनिमयातून सोडविणार आहे. त्यामुळे परस्पर शेतकऱ्यांची भांडणे होणार नाहीत. राष्ट्रीय एकात्मतेचे पालन होईल, गुण्यागोविंदाने नांदता येईल यासाठी लोकचळवळ उभारल्याची माहिती तहसीलदार शरद झाडके यांनी लोकमतशी बोलताना दिली.तहसीलदार झाडके यांनी ही चळवळ उभारुन बंधुभाव जोपासण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (वार्ताहर)
नंबरबांध रस्त्यासाठी तहसीलदारांनी उभारली लोकचळवळ
By admin | Updated: June 26, 2014 00:34 IST