जालना : पीकविम्यासाठी जालना जिल्ह्यास १९० कोटी १५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून सदरील निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.मंगळवारी येथील सर्वे नं. ४८८ मधील शासकीय विश्रामगृहात आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री लोणीकर बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, नायब तहसीलदार यांच्या संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करताना संबंधित अधिकाऱ्यांनी कोणताही निष्काळजीपणा करू नये. जे अधिकारी कामात हयगय किंवा टाळाटाळ करतील त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी, अशी सूचनाही यावेळी लोणीकर यांनी केली. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते, पासबुक आणि आधारकार्ड याची महसूल यंत्रणेकडे नोंदणी करावी. जेणेकरून त्यांना देण्यात येणारे लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा करणे सोयीचे होईल, असे आवाहनही पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)
पीकविम्याची रक्कम तातडीने द्या
By admin | Updated: May 20, 2015 00:17 IST