नांदेड : महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १ जुलैपासून आपल्या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन सुरु केले असून शनिवारी आंदोलनाचा पाचवा दिवस होता़ डॉक्टरांच्या या आंदोलनामुळे रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत़ त्यात शासनाने बंधपत्रित असलेल्या जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मेस्माच्या नोटिसा दिल्या आहेत़जिल्ह्यातील तब्बल २५० राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासकीय सेवेचे राजीनामे यापूर्वीच राज्याध्यक्षांकडे पाठविले आहेत़ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आंदोलनाबाबत वरिष्ठ स्तरावरुन चर्चेच्या अनेक फेऱ्याही झाल्या़ परंतु त्यातून तोडगा निघाला नाही़ त्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते़ त्यानंतर मॅग्मोने दहा दिवसांसाठी आंदोलन स्थगित केले होते़ आता पुन्हा एकदा गेल्या पाच दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरु आहे़ त्याचा फटका ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला बसत आहे़ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ विजय कंदेवाड यांनी आरोग्य सेवा प्रभावित होवू नये म्हणून कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्त केले आहे़ विशेष म्हणजे या काळात अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत़ त्याचबरोबर बाह्यरुग्ण, आंतररुग्ण विभाग, बाळांतपण, अपघात, शवविच्छेदन, साथरोगविषयक कामकाज, सर्व राष्ट्रीय कार्यक्रम, शासकीय बैठका आदींवर बहिष्कार टाकण्यात आला आहे़ दरम्यान, शासनाकडून बंधपत्रित असलेल्या जिल्ह्यातील जवळपास १० वैद्यकीय अधिकाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटिसा देण्यात आल्या आहेत़ तर जे वैद्यकीय अधिकारी कायम आहेत़ त्यांना मात्र अशा प्रकारच्या नोटिसा मिळाल्या नाहीत़ मागण्या मंजूर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले़ अशी माहिती अध्यक्ष डॉ़ नीळकंठ भोसीकर, सचिव डॉ़ राजेंद्र पवार, डॉ़ प्रताप चव्हाण यांनी दिली़ (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत १३६ वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांपैकी १०० अधिकारी संपात सहभागी झाले आहेत़ पर्यायी व्यवस्थेसाठी आयुर्वेदिक महाविद्यालयातील २० वैद्यकीय अधिकारी, आपत्कालीन सेवेचे अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियुक्त करण्यात आले आहेत़ कारवाईसंदर्भात जिल्हास्तरावर सूचना प्राप्त नाहीत़- डॉ़ बी़ एम़ शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी़२००९-१० मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकारी यांना पूर्वलक्ष लाभ मिळणे बाबत, निवृत्तीचे वय ६२ वर्षे करणे, बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावणे इतर अनेक मागण्यांच्या संदर्भाने हे आंदोलन सुरु केले आहे़
डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल
By admin | Updated: July 6, 2014 00:15 IST