पाटोदा : दहावी परीक्षेत गुरुवारी भूमितीचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार निरगुडी येथे उघडकीस आला. पेपरमधील प्रश्न क्रमांक चारच्या उत्तराच्या झेरॉक्स काढतानाच पोलीस धडकले. झेरॉक्स चालकासह शिपायाला अटक केली आहे.झेरॉक्स चालक १७ वर्षीय युवक आहे. राहुल विष्णू शेलार हा जवाहर विद्यालय, पाटोदा येथे शिपाई आहे. निरगुडी येथे भूमितीचा पेपर सुरू होताच शिपाई शेलार याने प्रश्न क्रमांक चार कागदावर लिहून बाहेर आणला. त्यानंतर त्याने तो शाळेजवळीलच झेरॉक्स दुकानात गेला. तेथे उत्तरासह झेरॉक्स काढण्यास सुरूवात झाली. झेरॉक्स घेण्यासाठी दुकानावर मोठी गर्दी झाली. याची खबर पाटोदा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी झेरॉक्स दुकानावर छापा टाकला तेव्हा प्रश्न क्रमांक चारच्या उत्तराच्या १०० प्रती आढळून आल्या. झेरॉक्स चालकासह शिपाई राहुल शेलार याला अटक करण्यात आली. झेरॉक्स प्रती, यंत्र व इतर साहित्य असा ६५ हजारांचा माल जप्त करण्यात आला. (वार्ताहर)
पाटोद्यात भूमितीचा पेपर फुटला !
By admin | Updated: March 13, 2015 00:42 IST