औरंगाबाद : नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांनी बुधवारी रेल्वेस्थानकाला भेट देत सीसीटीव्ही कॅमेर्यांची स्थिती, स्थानकातील सोयी-सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी सोयीसुविधांबाबत विविध सूचना केल्या. शर्मा यांनी रेल्वेस्थानकावरील कॅन्टीन, वेटिंग रूम, स्वच्छतागृह, तिकीट सेक्शन, सीसीटीव्ही रूम आदींची पाहणी केली. रेल्वेस्थानकाच्या जुन्या इमारतीमधील सीसीटीव्ही रूमला भेट देत त्यांनी स्थानकाच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. नव्या इमारतीत अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे जुन्या इमारतीमधील नऊ सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून किती भागावर देखरेख ठेवली जाते, याची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी स्थानिक अधिकार्यांकडून सोयीसुविधांच्या स्थितीबाबत माहिती घेताना विविध सूचना केल्या. जवळपास दोन तासापेक्षा अधिक वेळ त्यांनी ही पाहणी केली. यावेळी डीसीएम ए. एल. एन. रेड्डी, स्टेशन व्यवस्थापक अशोक निकम यांच्यासह स्थानिक अधिकार्यांची उपस्थिती होती. या पाहणीदरम्यान पी. सी. शर्मा यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी नांदेड येथे तिसर्या पीटलाईनचे काम सुरू असून आगामी आठ महिन्यात हे काम पूर्ण होईल. औरंगाबादेत पीटलाईन टाकण्याचे केवळ विचाराधीन असल्याची माहिती पी. सी. शर्मा यांनी दिली. रेल्वेस्थानकावरील जुन्या इमारतीत उभारण्यात आलेली लिफ्टची सुविधा सुरू करण्यास सुरक्षा प्रमाणपत्राच्या कारणामुळे विलंब झाला; परंतु हे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून आठवडाभरात ही सुविधा कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेस्थानकाच्या जुन्या इमारतीत ९ सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत; मात्र मॉडेल रेल्वेस्थानकाच्या पहिल्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या इमारतीत कामकाज सुरू होऊन मोठा कालावधी होऊनही अद्याप या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. मॉडेल रेल्वेस्थानकाच्या पहिल्या टप्प्यात इमारतीचे काम करण्यात आले, तर दुसर्या टप्प्यात मल्टी फंक्शन कॉम्प्लेक्सचा समावेश आहे; परंतु अद्यापही ते झालेले नाही. प्रतिसादाअभावी मल्टी फं क्शन कॉम्प्लेक्स रखडत असून त्यास प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा पी. सी. शर्मा त्यांनी व्यक्त केली. रेल्वेस्टेशन एमआयडीसीत उड्डाणपूल रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसर ते बीड बायपासला जोडणार्या रस्त्यावर उड्डाण पूल उभारण्याबाबत सीएमआयएचे अध्यक्ष मिलिंद कंक, मुनीश शर्मा यांनी रेल्वेस्थानकावर पी. सी. शर्मा यांची भेट घेतली. अनेक वर्षांपासून रखडलेला उड्डाण पुलाचा हा प्रश्न मार्गी लागल्यास मोठा फायदा होईल. राज्य शासनाकडूनही त्यासाठी निधी मिळू शकतो,आदींबाबत चर्चा करताना पी. सी. शर्मा यांनी सकारात्मकता दर्शविल्याची माहिती मुनीश शर्मा यांनी दिली. प्रवाशांनी काळजी घ्यावी रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांनी सतर्क राहण्याची गरज आहे. सतर्कतेमुळे दुर्घटना टाळता येऊ शकतात. त्यामुळे आपल्या आसन व्यवस्थेच्या खाली अथवा आजूबाजूला पडलेल्या बेवारस वस्तूंबाबत प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकार्यांना माहिती दिली पाहिजे. तसेच प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करता कामा नये, असे आवाहन विभागीय व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांनी केले.
रेल्वेस्थानकावरील प्रवासी सोयी-सुविधांची पाहणी
By admin | Updated: May 8, 2014 00:24 IST