लातूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मराठवाडा प्रमुख दिवाकर रावते यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील. जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या बळावर पक्ष मजबूत करू, असे मत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी रविवारी लातूर येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले. लातूर जिल्ह्यातील शिवसेनेची प्रतिमा उंचावण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांना व्यासपीठ दिले जात आहे. शिवसेना प्रमुखांना भेटण्यासाठी लातूरहून मुंबईला पायी जाणारा सामान्य कार्यकर्ता बालाजी भोसले आणि तळागाळातील लोकांशी नाळ जोडलेला संतोष सोमवंशी हे दोघे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त झाले आहेत. आगामी काळातही अनेकांना चांगली जबाबदारी दिली जाणार आहे. त्यावेळी जात-धर्म, गोत्र पाहिले जाणार नाही. येत्या काही दिवसात प्रत्येक तालुक्याला बैठका घेऊन पक्षबांधणी मजबूत करणार असल्याचे ते म्हणाले. गोर-गरीब जनता शस्त्रक्रियेपासून वंचित राहत असेल तर त्यांनी थेट संपर्क साधावा, असेही ते म्हणाले. भाकरी जास्त वेळ तव्यावर ठेवली तर करपते. तोच नियम काहीजणांबाबत दिसून आला. त्यामुळे पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांचे बदल करणे गरजेचे होते. निष्ठावान आणि सच्चा कार्यकर्त्यांना योग्य न्याय दिला जाईल. केवळ पैसा व संपत्तीच्या जोरावर पदासाठी प्रयत्न कोणीही करू नयेत. हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास असल्याचे संजय सावंत यांनी सांगितले. या पत्रपरिषदेस सहसंपर्कप्रमुख धोंडू पाटील उपस्थित होते.
शिवसैनिकांच्या बळावर पक्ष मजबूत
By admin | Updated: May 25, 2015 00:27 IST