बीड: गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लाखो कार्यकर्त्यांना आज उन्हाचे चटके सहन करावे लागले. परळीचे तापमान आज ४२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. अशा तळपत्या उन्हातही कार्यकर्ते मुंडे यांच्या अंत्यस्कारासाठी बसून होते. त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नि दिल्यानंतरच लोकांनी परतीचा रस्ता धरला. त्यानंतर अचानक हवामानात बदल झाला आणि दुपारी ३ वाजून ३० मिनिटानी पावसाला सुरूवात झाली. तळपत्या उन्हात अंगाची लाही-लाही झालेले लोक या अचानक आलेल्या पावसात भिजून चिंब झाले. बुधवारी सकाळपासूनच उष्णता वाढली होती. सकाळी दहा वाजल्यापासूनच अंगाची अक्षरश: लाही लाही होत असल्याचे दिसत होते. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. याठिकाणी सकाळपासूनच लोकांची गर्दी होत होती. लोक तळपत्या उन्हातच येथे बसून होते. अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी तळपते उन्हही लोक सहन करताना दिसत होते. अनेकांना या उष्णतेमुळे चक्कर येत असल्याचेही दिसत होते. काही जण उष्णतेमुळे डोळ्यापुढे अंधारी येत असल्याचे सांगत होते. कारखान्याच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या पिशव्यांचे वाटप केले जात असले तरी येथे आलेले लोक पाहता, पिण्याच्या पाण्याची यंत्रणाही अपुरी पडताना दिसत होती. दरम्यान, काही जणांनी बाहेरून पाण्याचे पाऊच व बाटलीबंद पाणी आणले. त्यावर अक्षरश: उड्या पडल्या. एकेका घोटभर पाण्यासाठी सर्वांची तगमग सुरू होती. आपल्या आवडत्या नेत्याला अखेरचा सलाम करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी भर उन्हातही जागा सोडली नाही. आहे तेथेच उन्हात तळपणारे कार्यकर्ते घामाने चिंब झाले होते. अंगातून घामाच्या धारा आणि डोळ्यातून अश्रू हे चित्र पहावयास मिळाले. अंत्यविधी आटोपल्यावर पावसाच्या सरी कोसळल्या.(प्रतिनिधी)
परळी @ ४२०
By admin | Updated: June 5, 2014 00:11 IST