औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचा ठेका घेतलेल्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीच्या फसवणुकीचे प्रकार आता उघडकीस येत असून, मनपा हद्दीच्या बाहेर नागरिकांकडून अभय योजनेंतर्गत लाखो रुपये जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, महापालिकेने कंपनीविरुद्ध फसवणूक, पैशांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेने १ सप्टेंबर २०१४ रोजी महापालिका हद्दीतील संपूर्ण पाणीपुरवठ्याचा भार औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीकडे सोपविला. कंपनीला फक्त मनपा हद्दीत काम करण्याचे अधिकार मनपाने दिले. कंपनीने मनपाच्या हद्दीत नसलेल्या अब्रार कॉलनी, शहानगर, बीड बायपास भागातील अनेक वसाहतींमध्ये अनधिकृत नळ अधिकृत करून देण्याची योजना आखली. सातारा परिसरात या वसाहतींचा समावेश असतानाही कंपनीने नागरिकांकडून लाखो रुपये जमा केले. अलीकडेच सातारा परिसराचा मनपा हद्दीत समावेश करण्यात आला आहे. कंपनीने मनपा हद्दीबाहेर जाऊन काम केले. ज्या नागरिकांकडून पैसे घेण्यात आले होते, त्यांना कस्टमर क्रमांकही दिला नाही. नागरिकांकडून जमा केलेले पैसे मनपाच्या तिजोरीतही जमा केले नाही. ज्या नागरिकांनी कंपनीला नळ अधिकृत करण्यासाठी पैसे दिले होते, ते नागरिक मनपा कार्यालयांमध्ये यावर्षीचे पैसे भरण्यासाठी येत आहेत. मनपाकडे त्यांचे नळ अधिकृत केल्याचे कोणतेही रेकॉर्ड नाही. मनपाने चौकशी केली असता कंपनीचे पितळ उघडे पडले. उपअभियंत्याच्या तक्रारीवरून साताऱ्यात गुन्हा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आय. बी. खाजा यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत कंपनीने १ सप्टेंबर २०१४ ते २८ जुलै २०१६ पर्यंत अनेक नागरिकांकडून अभय योजनेत पैसे जमा केले. कंपनीचे संचालक ऋषभ सुशील सेठी यांनी रक्कम मनपाकडे जमा केलीच नाही. कंपनीने महापालिकेची फसवणूक केल्याची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी फसवणूक आणि पैशांचा अपहार केल्याबद्दल सेठी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
‘समांतर’ने घातला मनपाला गंडा
By admin | Updated: July 30, 2016 01:01 IST