प्रताप नलावडे बीडशिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील आजवर सुरू असलेल्या छुप्या संघर्षाची जाहीर कबुली दस्तूरखुद्द मेटे यांनीच स्नेहमेळाव्यात बोलताना दिली. पंकजा यांनीच जिल्ह्यात युती करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याच्या गौप्यस्फोट केल्याने आता पालिका निवडणुकीतच मेटे आणि पंकजा हे दोघेही आमने-सामने येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर मेटे यांच्या राजकीय घौडदौडीला जिल्ह्यात लगाम घालण्याचे कामही पंकजा यांनी केले असल्याचे त्यांच्या वकतव्याने स्पष्ट झाले आहे.भाजपाचा मित्र पक्ष म्हणून शिवसंग्राम राज्यात कार्यरत असताना जिल्ह्यात मात्र मेटे यांची सातत्याने कोंडीच झाल्याचे पाहण्यास मिळाले. ही नेमकी कोंडी कोणी केली याची आजवर दबक्या आवाजात होणाऱ्या चर्चेला खुद्द मेटे यांनीच वाट मोकळी करून दिली. लोकसभेच्या निवडणुकीत आपली ताकद गोपीनाथ मुंडे यांच्या मागे उभी करणाऱ्या शिवसंग्रामला मुंडे यांच्या नंतरही भाजपाने आपला मित्र पक्ष म्हणून सन्मानाची वागणूक दिली. मेटे यांची विधान परिषदेवर वर्णी लावली परंतु त्यानंतर मात्र जिल्ह्यातील राजकारणाची समिकरणे बदलत गेली आणि पंकजा आणि मेटे यांच्यामधील शह-काटशहाचे राजकारण सुरूच राहिले. मंत्रीपदाकडे डोळे लावून बसलेल्या मेटे यांच्या पदरात दोन वर्षे उलटली तरी मंत्रीपद पडू शकले नाही. सर्व मित्रपक्षांना सामावून घेणाऱ्या भाजपाने मेटे यांना मात्र जाणीवपूर्वक टाळल्याने हा फटका मेटे यांना नेमका कोणामुळे बसला, याचीही चर्चा अनेक दिवस राजकीय वर्तुळात रंगली होती. मेटे यांनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने आपल्या मनातील ही खंत आणि खदखद नेमकेपणाने बोलून दाखविली. जिल्हा पातळीवर असे कराल तर राज्याचे नेतृत्व पुढे कसे करणार, असा टोला थेट पंकजा यांना लगावत त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले. नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणांची आपण मुख्यमंत्र्यांकडून चौकशी लावली तरी त्याची प्रत्यक्षात चौकशी रेंगाळली असल्याचे सांगत याचा ठपका त्यांनी पंकजा यांच्यावरच ठेवला. क्षीरसागर यांना सहकार्य करण्यासाठीच बीडमध्ये सेना-भाजपा आणि शिवसंग्रामची युती होऊ दिली नसल्याचेही त्यांनी सूचक विधान केले. मेटे यांनी केलेल्या या सूतोवाचामुळे आता जिल्ह्यात भाजपा आणि शिवसंग्राम यांच्यात सख्य नसल्याचे जाहीर झाले आहे. गेली दोन वर्षापासून जिल्हा बँकेची निवडणूक असो की जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक असो; भाजपाने मेटे यांना पध्दतशीरपणे बाजूला ठेवण्याचीच खेळी केल्याचे पहावयास मिळाले.
पंकजांनी अडवली मेटेंची घौडदौड !
By admin | Updated: November 8, 2016 00:20 IST