कोरोना रुग्णांसाठी राज्य शासनाने चिकलठाणा एमआयडीसी भागातील मेल्ट्रोन कंपनीच्या इमारतीत कोविड हॉस्पिटल सुरू केले. ३०० रुग्णांची क्षमता असलेले हॉस्पिटल महापालिकेमार्फत चालविले जात आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाचा अधिक प्रभाव असताना सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत शहरात ऑक्सिजन बेडची कमतरता होती. बहुतेक दवाखान्यांमध्ये ऑक्सिजन बेडस् उपलब्ध नव्हते. त्यामुळे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महापालिकेतर्फे मेल्ट्रोन हॉस्पिटल येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावा, अशा सूचना केल्या. त्यानुसार मेल्ट्रोनमध्ये स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून आर्थिक तरतूद करण्याचे देखील ठरविण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी सव्वाचार कोटींची तरतूद केली, तसे पत्र महापालिकेला प्राप्त झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निधी प्राप्त होणाऱ्या आशेवर महापालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण केली होती. निधी प्राप्त झाल्यावर संबंधित कंत्राटदाराला वर्कऑर्डर देऊन काम सुरू करणे बाकी होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निधी प्राप्त झाल्याचे पत्र मिळाल्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने वर्कऑर्डरची फाईल मंजुरीसाठी पाठवली. फाईल मंजूर झाली तरी प्रत्यक्षात ऑक्सिजन प्लांटचे काम अद्याप सुरू झालेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी निधीचे पत्र देऊन दोन महिने उलटले असले तरी निधी महापालिकेला मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनाने अद्याप काम सुरू केले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
कंत्राटदारांना वाईट अनुभव
महापालिका प्रशासनाच्या एका हाकेवर कंत्राटदारांनी आणि कंपन्यांनी कोरोना काळात काम केले. मात्र, अनेक कंत्राटदारांची बिले आजपर्यंत निघू शकले नाहीत. शासनाकडून निधी प्राप्त होत नसल्यामुळे अनेक कंत्राटदार हवालदिल झाले आहेत.