औरंगाबाद : मालकाच्या मल्टी सर्व्हिसेसचे बोगस खाते उघडून नोकराने मालकाचे सव्वालाख रुपये हडपल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपी नोकर व त्याच्या पत्नीविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे .घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, सावरकरनगर येथील रहिवासी बबन उत्तम सावळे यांची सिडको परिसरात मल्टीसव्हिर्सेस एजन्सी आहे. आरोपी प्रदीप वाघ (रा. एन-२, सिडको) हा त्यांच्याकडे कामाला होता. गेल्या काही दिवसांमध्ये प्रदीपने सावळे यांचा प्रचंड विश्वास संपादन केलेला होता. धनादेशाचे बरेच व्यवहारही तो बघायचा. मालकाने टाकलेल्या विश्वासाचाच त्याने विश्वासघात केला. त्याने देवगिरी बँकेत मालकाच्या एजन्सीच्या नावाने एक बोगस खाते उघडले. त्यावर एजन्सीची प्रोपरायटर म्हणून पत्नी वंदना प्रदीप वाघ हिचे नाव टाकले आणि मग एजन्सीच्या नावाने असलेला १ लाख २६ हजार रुपयांचा धनादेश प्रदीपने ‘त्या’ बोगस खात्यावर टाकून तो वटवून घेतला. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार मालक बबन सावळे यांच्या लक्षात आला. त्यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी प्रदीप व त्याच्या पत्नीविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नोकराने हडपले मालकाचे पैसे
By admin | Updated: September 17, 2014 01:15 IST