बीड : नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा मंगळवारी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या अनुपस्थितीमुळे तहकूब करावी लागली होती. सर्वसाधारण सभा घेण्याबाबत नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वसाधारण सभा तीन दिवसात घेण्याचे आदेश खंडपीठाने गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.मंगळवारी दुपारी १२.१५ वाजता नगर परिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी पहिली विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती. मात्र, या सभेत येण्यापूर्वीच डॉ. क्षीरसागर यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल व्हावे लागले. अधिक उपचारासाठी त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले. इकडे काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी सभा घेण्याबाबत कायदेशीर मार्ग काढण्याची विनंती प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून मार्गदर्शन मागविले होते. त्यावर अद्याप नगर विकास विभागाने निर्णय दिलेला नाही.काकू-नाना विकास आघाडीचे नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी जि.प.सभापती संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद उच्च न्यायालयात अॅड. सय्यद तौसीफ यासीन यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्या. महेश कानडे व न्या. संगीतराव पाटील यांच्यासमोर गुरूवारी सुनावणी झाली. सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर उपाध्यक्ष व नामनिर्देशीत सदस्य निवडीची सर्व साधारण सभा तीन दिवसाच्या आत सर्व नगरसेवकांना नोटिसा देऊन घेण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
सर्वसाधारण सभा तीन दिवसांत घेण्याचे आदेश
By admin | Updated: January 13, 2017 00:32 IST