सेनगाव: महाराष्ट्रात गुटखाबंदी असतानाही सेनगावसह तालुक्यात राजरोसपणे गुटखा विक्री होत आहे. उघडपणे चालणाऱ्या या गुटखा विक्री विरोधात कुठलीच कारवाई होत नसल्याने मागील काही दिवसांपासून गुटखा विक्रीने कहर केला आहे. पोलिस यंत्रणेसाठीही ही गुटखा विक्रीच हप्ता वसूलीसाठी नवे माध्यम बनली असल्याचे चित्र आहे.गुटखाबंदीचा निर्णय झाल्यापासून सेनगावात गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. सेनगावसह तालुक्यातील ग्रामीण भागात गुटखाविक्री करणारे ५० ते ६० हून अधिक फेरीवाले उघडपणे पानटपरी, किराणा दुकान, हॉटेल आदी ठिकाणी सितार, माणिकचंद, विमल, नजर आदी प्रकारच्या गुटख्यांचा भरमसाठ पुरवठा करीत आहेत; गुटखा बंदीच्या नावाखाली पानटपरी, किराणा दुकानदार, लपून छपून गुटखा विक्री करीत होते; परंतु कोणतीच कारवाई होत नसून या विरोधात स्थानिक यंत्रणा ‘मॅनेज’ असल्याने आता उघडपणे गुटका विक्री होत आहे. त्यामुळे खरोखरच गुटखाबंदी आहे का? हा प्रश्न तालुक्यात चालणाऱ्या राजरोस गुटखाविक्रीमुळे निर्माण झाला आहे. त्यास प्रशासकीय यंत्राणाही तितक्याच प्रमाणात जबाबदार आहे. असे असतानाही उघडपणे होणाऱ्या गुटखा विक्री विरोधात कारवाई करण्यासाठी एकाही यंत्रणेने तालुक्यात आजपर्यंत कोणतीच कारवाई केली नसल्याने गुटखा विक्री करणाऱ्यांचे मनोधेर्य कमालीचे वाढले आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, वाशिम जिल्ह्यातील रिसोड, परभणी, वाशिम आदी मार्गे तालुक्यातील सेनगाव, गोरेगाव, साखरा, पुसेगाव, पानकनेरगाव, आजेगाव आदी परिसरात गुटखा विक्रीचा पुरवठा होतो. अन्न-औषधी प्रशासन व पोलिस यंत्रणेने तालुक्यात राजरोसपणे चालणाऱ्या गुटखा विक्री विरोधात आजपर्यंत एकही कारवाई केल्याचे दिसत नाही. गुटखा विक्री पुरवठादारांची इत्यंभूत माहिती स्थानिक पोलिसांना असतानाही कारवाई होत नसल्याने एका प्रकारे गुटखा विक्री व्यवसायाला पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याचा आरोप होत आहे. गुटखा विक्री करणारे विक्रेते छातीठोकपणे आपल्या विरोधात कुठलीच कारवाई होत नसल्याचे सांगत आहेत. अशा निर्भयपणे, उघडपणे गुटखाविक्री करणाऱ्या विरोधात मागील दोन वर्षात एकही कारवाई झाली नसल्याने त्यांच्या व्यवसायाला पोलिस यंत्रणेसह अन्य विभागाचे एक प्रकारे पाठबळ असल्याचा आरोप होत आहे. गुटखा विक्री करणारे चार चाकी वाहन दिवसा ढवळ्या मालाचा पुरवठा करीत असताना पोलिस यंत्रणेच्या नजरेला हा प्रकार पडत नाही. राजरोसपणे चालणाऱ्या गुटखाविक्री व्यवसायात अनेकांचे हात गुंतले असून नाममात्र दरात येणारा गुटखा चढ्या दराने विक्री केली जात आहे. (वार्ताहर)
गुटखांबदी आदेशाची पायमल्ली; सर्रास विक्री
By admin | Updated: July 1, 2014 00:12 IST