जालना : नोंदणीकृत संस्था आणि किरकोळ विक्रेत्यांकडून पुरवठा केल्या जाणाऱ्या दुधातील भेसळ थांबविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले आहेत.या जिल्ह्यात दुधाच्या मागणी एवढे उत्पादन होत नाही. परिणामी जालना शहरासह जिल्ह्यातील सातही तालुक्यांना जिल्हा बाहेरच्या दुधावरच पूर्णत: अवलंबून रहावे लागते. त्यामुळे या जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्याच्या कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होतो. जिल्ह्याबाहेरच्या नगर, श्रीरामपूर, आष्टी, संगमनेर वगैरे भागातून दररोज हजारो लिटर दूध विक्रीस दाखल होते. या कंपन्यांच्या दुधाच्या गुणवत्तेबाबत अधून-मधून तक्रारींचा सूर आढळून आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातून खाजगी व्यक्ति किंवा संस्थांकडून पुरवल्या जाणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेसंदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी सोमवारी जिल्हा अन्न व औषध प्रशासन, तसेच दूग्ध विकास अधिकाऱ्यांबरोबर खास बैठक घेतली. त्यातून या जिल्ह्यातून तसेच बाहेरच्या जिल्ह्यातून पुरवठा होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेसंदर्भात तपशीलवार चर्चा केली. जिल्ह्यातील दूध पुरवठ्याची माहिती घेतली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाहेरच्या जिल्ह्यातून दुधाचा पुरवठा होत आहे, असे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. जिल्ह्यात ४१ नोंदणीकृत संस्था आहेत.जिल्ह्यात दररोज या नोंदणीकृत संस्थाकडे सतत हजार लिटर दुधाचे संकलन होते. या दुधाची जिल्ह्यातील तीन ठिकाणी असलेल्या शासकीय प्रयोग शाळेतून नियमितपणे तपासणी केली जाते.जिल्ह्यात माहोरा, जालना आणि अंकुशनगर याठिकाणी या प्रयोग शाळा आहेत, असे नमूद करीत या अधिकाऱ्यांनी अप्रमाणित दुधाचे संकलन झाल्यास जे परत केले जाते, अशी माहिती दिली. (प्रतिनिधी)
दूध भेसळीविरुद्ध मोहीम राबविण्याचे आदेश
By admin | Updated: August 6, 2014 02:14 IST