णेगूर : व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी मुरूम येथे शुक्रवारी विविध संघटनांच्या वतीने निषेध रॅली काढून कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, या प्रकरणावरून गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी स्वत: पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे फौजफाट्यासह मुरूम शहरात दाखल झाले होते. २७ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट झाला होता. यावरून गुरूवारी दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध संघटनांच्या वतीने पोलिस प्रशासनाला निवेदन देवून आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी शहर बंद ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले. यास नागरिकांसह व्यापाऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, सकाळी शिवाजी चौकातून हिंदू एकता व भाजपा शहराध्यक्ष राम डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. मुख्य मार्गावरून हा मोर्चा पोलिस ठाण्यात पोहोंचल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत खांडवी व सपोनि विलास गोबाडे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी हजर होते (वार्ताहर)मुरूम शहरात निषेध मोर्चा झाल्यानंतर नगर पालिका सभागृहात शांतता कमिटीची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी दोन्ही समाजातील बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले. या बैठकीस नगराध्यक्ष धनराज मंगरूळे, शरणाप्पा गायकवाड, दत्ता इंगळे, अशोक मिणियार, दाजी फुगटे, महावीर नारायणकर, रशिद शेख, अजीज डिग्गे, महेबूब शेख आदी उपस्थित होते. कुरेशी यास कोठडी४गुरूवारी या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. मुरूम पोलिस पथकातील पोना किरण औताडे, अमीत करपे यांनी या घटनेतील आरोपी आरीफ आत्ताउल्ला कुरेशी यास गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास विजापूर जिल्ह्यातील झळकी येथील एका ढाब्यावरून ताब्यात घेतले असून, उमरगा न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.