औरंगाबाद : बाजारात रेडिमेड फराळ विकत मिळत असला तरीही त्यास घरच्या पदार्थांची चव येत नाही, असे म्हटले जाते. कारण, सुगरणीच्या मायेचा आस्वाद त्या फराळात उतरलेला असतो. अशाच पाककौशल्य नैपुण्य असलेल्या सुगरणींच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी लोकमत सखी मंचतर्फे २० आॅक्टोबर रोजी ‘दिवाळी फराळ स्पर्धे’चे आयोजन केले आहे. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असून घराघरांतून फराळाचा खमंग वास दरवळत आहे. चविष्ट फराळ बनविण्यात सुगरणींचा हातखंड असतो. अशा सुगरणींची समाजाला ओळख व्हावी, त्यांच्या पाककलेचे व कल्पकतेचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी कौतुक करावे, यासाठी सखी मंच फराळ स्पर्धा घेत आहे.फराळाचे गोड पदार्थ व तिखट पदार्थ अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या दोन्हींपैकी एकाच चवीचा पदार्थ सुगरणींना घरी तयार करायचा आहे. स्पर्धेच्या ठिकाणी फराळाच्या पदार्थासोबत रेसिपीही लिहून आणायची आहे. फराळाची सजावट मात्र स्पर्धेच्या ठिकाणी करावी लागणार आहे. यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. सोमवार, दि.२० आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता लोकमत भवन येथे स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धकांनी अर्धा तास अगोदर हजर राहणे आवश्यक आहे. ही स्पर्धा खास सखी मंचच्या सदस्यांसाठी आहे. दोन गटांतून प्रत्येकी तीन विजेते जाहीर करण्यात येणार आहेत. यात प्रथम बक्षीस ३ हजार रुपयांचे दागिने, द्वितीय क्रमांकास २ हजार रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास १ हजार रुपयांचे दागिने बक्षीस देण्यात येणार आहेत. मग तयार व्हा, सुगरणींनो खुसखुशीत, कुरकुरीत, चटपटीत, खमंग फराळाचे पदार्थ तयार करून जिंका दागिने. आरजू ज्वेलर्स या स्पर्धेतील बक्षिसांचे प्रायोजक आहेत.
सुगरणींना पाककौशल्य दाखविण्याची संधी
By admin | Updated: October 19, 2014 00:39 IST