उस्मानाबाद : जिल्ह्याने मागील तीन ते चार वर्षात भीषण दुष्काळी परिस्थिती अनुभवली. या संकटामुळे शेती व्यवसाय अक्षरश: मोडून पडला. शेतकरी कर्जबाजारी झाला. कर्जाचा डोंगर असह्य होत असल्याने जगाचा पोशिंंदा असलेला बळीराजा मृत्यूला जवळ करु लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, या प्रमुख मागणीसाठी विरोधकांच्या वतीने संघर्षयात्रा काढण्यात आली आहे. ही संघर्षयात्रा रविवारी उस्मानाबादेत दाखल होत आहे. यानिमित्त सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.कधी गारपीट तर कधी भीषण दुष्काळ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा संकटामुळे शेती व्यवसाय आतबट्याचा ठरत आहे. परिणामी कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. आजवर जिल्हाभरातील थोडेथोडक्या नव्हे तर तब्बल ४३७ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून आत्महत्येचे प्रमाण विचारात घेता, सर्वाधिक आत्महत्या या उस्मानाबाद जिल्ह्यात झाल्या आहेत. दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुमारे साडेपाचशे कोटीच्या पॅकेजची घोषणा केली होती. परंतु अद्यापही पॅकेजची अपेक्षित अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आत्महत्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने जिल्ह्यातील अधिकांश आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुंबाच्या भेटी घेवून परिस्थिती जाणून घेतली असता, जवळपास सर्वच आत्महत्या या आर्थिक अडचण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून झाल्याचे समोर आले आहे. आत्महत्यांची संख्या लक्षात घेता शासनाने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर दूर करण्याची गरज आहे. याच प्रमुख मागणीसाठी विरोधकांच्या वतीने २९ मार्चपासून चंद्रपूर येथून संघर्षयात्रा काढण्यात आली आहे. ही संघर्षयात्रा रविवारी उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे सकाळी ११ वाजता दाखल होर्ईल. याठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने संघर्षयात्रेचे स्वागत केले जाईल. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता छायादीप मंगल कार्यालय येथे संघर्षयात्रेतील नेते सभेच्या माध्यूमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या सभेला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राकाँ जिल्हाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांचा आज यल्गार..!
By admin | Updated: April 2, 2017 00:15 IST