औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने विरोधकांच्या संपर्कासाठी ८ कोटी रुपये काढून ठेवले आहेत. विरोध करणाऱ्या प्रत्येकाला भेटून काही रक्कम देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. एमआयएमच्या नगरसेवकांनाही त्यात ओढले जात होते. कंपनीचा तो प्रयत्न हाणून पाडल्याचा दावा करीत आ.इम्तियाज जलील यांनी योजनेला विरोध करणाऱ्या भाजपने यू-टर्न घेत कंपनीच्या बाजूने समर्थन देऊ केल्यामुळे साशंकता निर्माण केली. कंपनीने जनसंपर्क या हेडखाली तर रक्कम बाजूला ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपने विरोधाऐवजी समर्थन देण्यामागे कारण काय आहे, हे त्यांनाच विचारले तर बरे होईल. कंपनीने जनसंपर्कासाठी बाजूला ठेवलेल्या ८ कोटींचा परिणाम भाजपवर झाला आहे काय, याचे उत्तर देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कंपनीवर आरोप करताना आ.जलील म्हणाले, आ.अतुल सावे यांनी समांतर जलवाहिनीसाठी केलेला करार कसा चुकीचा आहे, याविषयी भाषण केले होते. त्या कराराला भाजपचा विरोध असल्याचे सांगण्यात आले होते. मग आताच असे काय घडले की, ज्यामुळे भाजपने या योजनेच्या बाजूने भूमिका घेतली आहे. या योजनेमुळे सर्वसामान्यांना त्रास होणार आहे. तत्कालीन मनपा आयुक्त केंद्रेकर आणि विद्यमान आयुक्त बकोरिया यांनी योजनेला विरोध दर्शविला आहे. त्यांनी न्यायालयात शपथपत्र सादर केले आहे. कंपनीला विरोध होत असल्यामुळे ८ कोटींतून मनधरणीची योजना हाती घेण्यात आली आहे. कंपनी बोलणीसाठी एखादी बैठक करावी, अशी मागणी करीत होती; परंतु ही मागणी धुडकावल्याचा दावा आ.जलील यांनी केला.
समांतरची ८ कोटींतून ‘विरोधक’ संपर्क मोहीम
By admin | Updated: May 13, 2016 00:09 IST