हिंगोली: जिल्ह्यात एकाचवेळी सर्वच आरोग्य उपकेंद्रांना आदर्श बनविणे शक्य नसले तरी मॉडेल म्हणून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कॉर्पोरेट आरोग्यसुविधा देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.आरोग्य खात्याच्या सचिव सुजाता सौनिक यांनी पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या धर्तीवर आरोग्य केंद्रांत भौतिक सामुग्री व मनुष्यबळासाठी हा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. निवड झालेल्या केंद्रांमध्ये प्रसुती, बाह्यरुग्ण विभागात रुग्णसंख्यावाढ, नियमित लसीकरण, शस्त्रक्रिया कक्ष व नियमित कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रिया करून जिल्हा स्तरावरील बहुतांश सेवा येथेच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. येथे आलेल्या रुग्णाचे समाधान होईल, एवढी काळजी घेण्याचा हा उपक्रम आहे. अशा केंद्रांमध्ये भौतिक सुविधाही देण्याचा प्रयत्न आहे. शस्त्रक्रियांसाठी लागणारी यंत्र व साहित्यसामुग्री, बेड, अद्ययावत वेटिंग व मिटिंग हॉल, औषधीसाठा, वाटपासाठी संगणकीय सुविधा आदी बाबींचा समावेश आहे. त्याचबरोबर स्वच्छता आणि परिसर नैसर्गिकदृष्ट्या हिरवाईने नटलेला असावा, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. अशा केंद्रात दोन नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पूर्ण स्टाफ कार्यरत राहिल, याची दक्षता घेतली जाणार आहे. शिवाय या सर्वांना मुख्यालयी राहणे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे यांनी सक्तीचे केले आहे. याबाबत दुसऱ्यांदा पाहणी लवकरच होणार आहे. त्यानंतर बहुतांश बाबी कार्यान्वित होतील, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
आरोग्य विभागाचे आॅपरेशन कायापालट
By admin | Updated: August 26, 2014 23:56 IST