परभणी : येथील कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांमधून विशेष भरती मोहिमेत रखडलेल्या २३१ प्रकल्पग्रस्तांच्या नियुक्तीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिले़ भाजप महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे़ कृषी विद्यापीठात २००९ मध्ये प्रकल्पग्रस्त उमेदवारांमधून विशेष भरती मोहीम हाती घेतली़ वर्ग ३ ची २२ व वर्ग ४ ची २०९ अशा २३१ पदांसाठी २६ आॅगस्ट २००९ रोजी भरती प्रक्रिया घेण्यात आली़ परंतु, विद्यापीठ प्रशासनाने आरक्षणाच्या गैरसमजुतीतून ही प्रक्रिया रखडत ठेवली होती़ त्यातच शासनस्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १ नोव्हेंबर २०१३ रोजी बैठक घेऊन भरती प्रक्रिया व जाहिरात रद्द करण्याचा निर्णय झाला़ भरती प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली असताना रद्द केल्याने अन्याय झाल्याची भावना बळावली़ त्यातून प्रकल्पग्रस्तांनी न्यायालयात याचिका दाखल केली़ २९ आॅक्टोबर रोजी न्यायालयाच्या निर्णयानुसार कृषी विद्यापीठातील भरतीची जाहिरात व भरती प्रक्रिया योग्य व कायदेशीर असलयाचे घोषित केले होते़ तसेच २००९ च्या जाहिरातीनुसार सुरू झालेली ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते़ या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत प्रकल्पग्रस्तांनी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली़ त्यानुसार आनंद भरोसे यांनी १४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ तेव्हा मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश कृषी व पणनचे अप्पर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांना दिले़ या निर्देशामुळे प्रकल्पग्रस्तांचा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे़ (प्रतिनिधी)
पद भरतीचा मार्ग मोकळा
By admin | Updated: December 15, 2015 23:44 IST