औरंगाबाद : आजकाल पोट भरण्यासाठी चोऱ्या करण्याऐवजी मौजमजा आणि हव्यासापोटी चोऱ्या करणारेच सर्वाधिक चोरटे असतात. अशा चोरट्यांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडविली तरच चोऱ्या कमी होतील, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. शहरातील विविध ठिकाणी मंगळसूत्र चोरी, वाहनचोरी आणि घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांकडून पोलिसांनी हस्तगत करण्यात आलेले तब्बल ५१ लाख रुपये किमतीचे दागिने, वाहने आणि मोबाईल मूळ मालकांना गुरुवारी सकाळी तापडिया नाट्यमंदिर येथे वाटप करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.तापडिया नाट्यमंदिर येथे पोलीस आयुक्तालयातर्फे मालकांना मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम झाला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त वसंत परदेशी, उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविकात पोलीस आयुक्त म्हणाले की, चोऱ्या, घरफोड्या होऊ नयेत, यासाठी पोलीस प्रयत्नशील असतात. मात्र, नागरिकांनीही काळजी घेतल्यास चोऱ्यांचे प्रमाण नक्की कमी होऊ शकते. याप्रसंगी अनेक तक्रारदारांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन सहायक आयुक्त बाहेती यांनी केले तर आभार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी मानले.१४ मार्च रोजी रामा हॉटेल सिग्नल येथे दुचाकीस्वार कापूस व्यापाऱ्याची ११ लाख ७२ हजार रुपये रोख असलेली बॅग दुचाकीस्वार तीन चोरट्यांनी हिसकावून नेली होती. ४भरदिवसा लूट करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले आणि त्यांच्याकडून एकूण रकमेपैकी ११ लाख १० हजार रुपये जप्त केले. ही रक्कम कापूस व्यापारी देवराव पुंड आणि शेख रियाज (रा. कवडगाव) यांना परत मिळाली.
चोरांना अद्दल घडविली तरच चोऱ्या कमी
By admin | Updated: July 1, 2016 00:33 IST