उस्मानाबाद : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबियास आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करण्यात आले. परंतु, या योजनेच्या बाबतीत प्रचार-प्रसिद्धीकडे अपेक्षित प्रमाणात लक्ष न दिल्यामुळे मागील चार महिन्यांत अवघे नऊ प्रस्ताव दाखल झाले आहेत. रस्ता अथवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडणे, सर्पदंश, प्राणीदंश, खून, जंगली जनावरांचा हल्ला, दंगल, उंचावरून पडणे आदी कारणांमुळे शेतकऱ्याचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यानंतर संबंधित कुटुंब उघड्यावर येते. अशा परिस्थतीत शेतकऱ्याच्या कुटुंबाला आधार मिळावा, यासाठी युती शासनाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली. सातत्याने उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून विमा संरक्षणाची रक्कमही दुप्पट करण्यात आली. या पूर्वीच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अवघे एक लाख रूपये मिळत असत. परंतु, आता दोन लाख रूपये मिळणार आहेत. पूर्वी एखादा अवयव निकामी झाल्यास ५० हजार रूपये मिळत असत. आता ही रक्कम दुप्पट म्हणजेच एक लाख रूपये एवढी करण्यात आली आहे. दोन डोळे, दोन अवयव अथवा एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यानंतरही दोन लाख रूपये दिले जाणार आहेत. शासनाकडून विमा संरक्षणाची रक्कम दुप्पट केल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, तुर्तास तरी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे प्राप्त प्रस्तावांवरून लक्षात येते. या योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाल्यापासून ते आजतागायत म्हणजेच मागील चार महिन्यात अवघे ९ प्रस्ताव दाखल झाले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात फेरफटका मारला असता, अनेक शेतकऱ्यांना सदरील योजनेबाबत विस्तृत माहिती नाही. योजनेच्या अटी काय आहेत? कुठल्या प्रकारच्या अपघाताला विमा मिळतो? त्यासाठी कोणकोणी कागदपत्रे लागतात? याबाबतही शेतकरी अनभिज्ञ आहेत. ही बाब लक्षात घेवून तरी कृषी विभागाने योजनेच्या जनजागृतीवर भर देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
ंचार महिन्यांत अवघे नऊ प्रस्ताव
By admin | Updated: March 24, 2016 00:43 IST