जालना: जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेतून लोकवर्गणीचा पंधरा कोटी रुपयांचा वाटा अदा केल्याशिवाय अंबडकरांना पाणी देऊ दिले जाणार नाही, असा इशारा माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिला. या योजनेतून जालन्यापर्यंत पाणी पोहचावे म्हणून आपल्यासह पालिकेने सर्वार्थाने प्रयत्न केले आहेत. विशेषत: अनंत अडचणी असताना सुद्धा पालिकेने लोकवर्गणीचा पन्नास कोटी रुपयांचा वाटा उचला. पाठोपाठ विजेची थकित बिले अदा केली. देखभाल दुरुस्तीचा खर्च सुद्धा उचलला. त्याचबरोबर या योजनेतून पाणी मिळावे म्हणून अंबड पालिकेने केलेल्या प्रयत्नांना आम्हीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यासाठी लोकवर्गणीचा अंबडने पंधरा कोटींचा लोक वाटा उचलावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु त्या संदर्भात अंबड पालिकेने एक छदामही रक्कम आदा केली नाही. अशी खंत गोरंट्याल यांनी व्यक्त केली. आता पाण्यासाठी अंबडकरांनी सुरु केलेल्या तोडफोडीसह संघर्षाची भाषा पूर्णत: गैर आहे. असे नमूद करीत पंधरा कोटींचा वाटा उचलावा. तेंव्हाच युटिलिटी कंपनीकडून व्यावसायिक दराद्वारे पाणी उपलब्ध केले जाईल असे ते म्हणाले. अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरणाच्या कामात कोणताही व्यत्यय येऊ नये किंवा जलवाहिनीची तोडफोड होऊन पाणी पळविले जाऊ नये म्हणून आपण जिल्हा पोलिस अधीक्षकांना एक निवेदन सादर करणार आहोत. त्याद्वारे केंद्रासह जलवाहिनीस संरक्षण मिळावे अशी मागणी करणार आहोत, असे ते म्हणाले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सदोष झाल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला. प्रिंटेड मतपत्रिका कर्तव्यावर असणाऱ्यांना वेळेत वाटप करण्यात आल्या नाहीत. शिवाय ४ हजार मतदारांची नावे दुबार आली आहेत. मयतांची नावे वेळेत वगळण्यात आली नाहीत, असे ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल हफिज, विनोद यादव, अरुण मगरे, राम सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वाटा भरा तरच अंबडकरांना पाणी
By admin | Updated: October 28, 2014 00:57 IST