उस्मानाबाद : तीन ते साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील आठ शहरांतील स्वच्छतेची कामे करण्यासाठी केवळ ५१६ कर्मचारी कार्यरत आहेत़ बहुतांश सर्वच पालिकांनी खासगी करार करून स्वच्छतेची कामे दिली आहेत़ मात्र, शहरातील मुख्य रस्त्यासह विविध विभागातील स्वच्छता नावालाच दिसत आहे़ नगर पालिकांकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने स्वच्छता मोहीम कागदावर राहत असून, ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी सर्वसामान्यांचा पुढाकार गरजेचा आहे़संत गाडगेबाबांनी ‘स्वच्छते’चा संदेश देण्यात उभे आयुष्य घालविले़ त्यांच्या नावावर शासनाने राज्यभरात स्वच्छता मोहिमही राबविली़ त्यानंतर पंतप्रधानांनी हातात झाडू घेवून ‘स्वच्छ भारत अभियाना’स सुरूवात केली आहे़ जवळपास सव्वालाख लोकसंख्येच्या उस्मानाबाद शहरासह इतर सात शहरातील नगर पालिकांकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोठा अभाव आहे़ हे कर्मचारी सकाळच्या सत्रात शहरातील बाजारपेठेसह मुख्य मार्गावरील साफसफाईची कामे करतात़ हे कर्मचारी शहराच्या बहुतांश भागात विशेषत: वाढीव हद्दीपर्यंत पोहचू शकत नाहीत़ त्यामुळे शहरातील मुख्य भागातील गटारी तुंबल्या असून, रस्त्याच्या कडेला, कचरा कुंडी परिसरातही मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ अस्वच्छतेमुळे साथरोगाचा धोका उद्भवत असून, डासांसह डुकरांचाही उच्छाद सर्वच शहरांमध्ये वाढला आहे़ पालिका प्रशासनही अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे स्वच्छता मोहिमेला मूर्त रूप देण्यात अपयशी ठरत आहे़ त्यामुळे शहरातील नागरिकांसह, व्यापाऱ्यांनी घर, दुकानाचा परिसर स्वच्छ ठेवल्यानंतर ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल़ (प्रतिनिधी)
आठ शहरांसाठी अवघे ५१६ सफाई कर्मचारी
By admin | Updated: November 30, 2014 00:55 IST