जिल्हा परिषद : १०० टक्के निधी खर्च करण्याचा बांधकाम विभागाचा दावा
---
औरंगाबाद : जिल्हा परिषदेला विविध १८ योजनांसाठी २०१९-२०साठी मंजूर ७२.४३ कोटींच्या निधीपैकी डिसेंबरअखेरपर्यंत ३५.९३ कोटींचा खर्च झाला आहे, तर मार्चअखेरपर्यंत ३६.४० कोटींचा निधी खर्च करण्याचे आव्हान बांधकाम विभागासमोर असताना १०० टक्के निधी खर्च होईल, असा दावा केला जात आहे. त्या दृष्टीने नियोजन सुरू असून, एकही रुपया परत जाणार नाही, असा दावा बांधकाम विभागाने केला आहे.
उपअभियंता ए.झेड. काझी म्हणाले, रस्ते परीक्षण व दुरुस्ती गट अ, गट ड, आयुर्वेद दवाखाने दुरुस्ती, यात्रास्थळ विकास कार्यक्रमाचा निधी १०० टक्के खर्च झाला आहे. ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण ४७ टक्के आणि इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरण ५१ टक्के निधी खर्च झाला आहे. यातील डांबरीकरणाची कामे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील. ती वेळेत पूर्णही केली जातील. या दोन्ही योजनेचा सुमारे २० कोटींचा निधी खर्च करण्याचे त्यादृष्टीने नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. रस्ते परीक्षण व दुरुस्ती गट ब आणि गट कच्या तांत्रिक अडचणी सुटून हाही निधी १०० टक्के खर्च होईल. शाळा दुरुस्तीच्या कामांनाही गती देण्यात आली असून, त्यासंबंधी चारही योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत, तर सर्वाधिक कमी निधी अंगणवाडी इमारत बांधकामांचा शिल्लक आहे. केवळ २६.२३ टक्केच खर्च झाला आहे. सर्व १८ योजनांचा १०० टक्के निधी खर्च होईल. यासाठी बांधकाम विभागाचे नियोजन असून, पुढील वर्षाचे नियोजनही सध्या सुरू असल्याचे काझी यांनी सांगितले.