दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात केवळ २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे सावट परिसरात निर्माण झाले आहे. या धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.या धरणात २० गावांना पाणीसाठा राखीव ठेवण्यात आलेला आहे. भोकरदन शहरासह दानापूर, देहेड, मुर्तड, पिंपळगाव रेणुकाई, सुरंगळी, कठोरा बाजार, करजगाव, कल्याणी, दगडवाडी, मनापूर, भायडी, तळणी, सिपोरा बाजार, बाभुळगाव, विरेगाव आदी गावांसाठी या धरणात पिण्यासाठी पाणी राखीव ठेवलेले आहे. परंतु सध्या राखीव पाणीसाठा ठेवूनही धरणाजवळील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपाचा वीजपुरवठा अद्यापही खंडित केलेला दिसून येत नाही. सध्या धरणात केवळ २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अद्याप पाच ते सहा महिने पावसाळा बाकी आहे. तोपर्यंत या वीस गावांना पाणी पुरणे शक्य होणार नाही, असे चित्र दिसून येत आहे.धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस झपाट्याने खालावत आहे. धरणालगत खाजगी विहिरींना आळा घालण्याची आजरोजी खरी गरज आहे. विहिरींची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढत असल्यामुळे धरणातील पाणीही या विहिरीत पाझरत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. या बाबीकडे पाटबंधारे विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील केवळ एकमेव मोठे धरण होय. या धरणात यावर्षी परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने १२ फुट जलसाठा झाला होता. धरणात असलेल्या पाण्याची निगराणी ठेवण्याची गरज असून, धरण परिसरात विहिरींवर सुरू असलेल्या विद्युत पंपांचाही वीजपुरवठा खंडित करणे गरजेचे आहे. शिवाय नवीन विहिरी परिसरात घेण्यासही मज्जाव करावा, जेणेकरून पाणीपातळीत आणखी घट होणार नाही व परिसरातील २० गावांना उन्हाळ्यातही पाणी पुरेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. धरणापासून दूर असलेल्या विहिरींनी आजरोजीच तळ गाठले आहे. त्यामुळे येथील जनावरे, शेळ्या व राजस्थानी लोकांचे जनावरे या धरणावर पाण्यासाठी आणतात. (वार्ताहर)
‘जुई’त केवळ २० टक्के पाणीसाठा
By admin | Updated: February 2, 2016 00:23 IST