१४ व्या वित्त आयोगातून झालेल्या विकासकामांचे संबंधितांना ग्रामपंचायतीकडून धनादेशाद्वारे देयके दिली जात असे. परंतु, आता १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करताना त्याची देयके हे धनादेशाद्वारे न करता पीएफएमएस (पब्लिक फायनांसिअल मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणालीद्वारे ऑनलाईन देयके दिली जात आहेत. यात काम पूर्ण झाल्याचे छायाचित्र जोडणे, त्याचे मूल्यांकन करणे, आदी बाबी अपलोड केल्या जातात. त्यानंतर सरपंच व ग्रामसेवक यांची डिजिटल स्वाक्षरी केली जाते. लागलेले मजूर, सिमेंट, अन्य साहित्य यांची देयके संबंधिताची खाते क्रमांक या प्रणालीला जोडून सरपंच व ग्रामसेवक यांच्या डिजिटल स्वाक्षरीने दिली जातात. यामुळे ग्रामपंचायतीमधील कारभार अधिक पारदर्शक होऊन गैरव्यवहार रोखला जातो. तालुक्यात प्रथमच आवडे उंचेगाव ग्रामपंचायतीने या प्रणालीचा यशस्वी उपयोग केला. सरपंच ज्योती आंधळे, उपसरपंच सीताराम काकडे, पैठण पंचायत समितीचे संगणक अभियंता निखिल खिस्ती, ग्रामसेवक शिवराज गायके, संगणक परिचालक रोहित भुसारे यांच्या प्रयत्नाला यश मिळाले.
आवडे उंचेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ऑनलाईन निधी हस्तांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:06 IST