औरंगाबाद : शहरात आॅनलाईन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मनपाला चार वर्षांमध्ये वर्षाकाठी ५ कोटी याप्रमाणे २० कोटी रुपयांचा गंडा घातला गेला आहे. चार वर्षांत पहिल्यांदाच मनपाने वेगवेगळ्या कंपन्यांकडून आलेला अडीच कोटी रुपयांचा माल कुरिअर कार्यालयातून जप्त केला आहे. सात दिवसांमध्ये तो माल संबंधित कंपन्यांनी सोडून न्यावा. मागील चार वर्षांतील उलाढाल सादर करून त्याची दंडनिहाय रक्कम भरावी, अशी नोटीस एलबीटी कक्षाने कंपन्यांना बजावली आहे. पालिकेच्या अज्ञानामुळे म्हणा किंवा खाबूगिरीमुळे आजवर आॅनलाईन ट्रेडिंग करणाऱ्यांना मोकळेरान होते. आयुक्त पी. एम. महाजन, उपायुक्त किशोर बोर्डे, एलबीटी अधिकारी अय्युब खान, शहर अभियंता एस. डी. पानझडे आदींनी पत्रकार परिषदेत मनपाने आॅनलाईन खरेदीला यापुढे चाप बसविणार असल्याचे सांगितले. आयुक्त महाजन म्हणाले, पोलीस सायबर सेल, मोबाईल कंपन्यांची मदत घेऊन आॅनलाईन नोंदणी करणाऱ्यांचा शोध घेतला जाईल. तसेच कंपन्यांना नोटीस दिली आहे. कंपन्या स्वत: नोंदणी करतील असे वाटले होते. म्हणून आजवर कारवाई केली नाही. मोबाईल अॅप्स सर्व्हिस प्रोव्हायडरवर करडी नजर ठेवू. शहरातून रोज ५५ लाख रुपयांची आॅनलाईन खरेदीसाठी नोंदणी होत असल्याचा अंदाज खान यांनी व्यक्त केला. त्यातून सव्वालाख रुपयांचा एलबीटी मनपाला रोज मिळणे गरजेचे आहे. तो महसूल बुडतो आहे, असे एलबीटी अधिकारी खान यांनी सांगितले. ४महिन्याला १५ ते १६ कोटी रुपयांच्या आसपास, तर वर्षाला २०० कोटी रुपयांच्या आसपास आॅनलाईन खरेदी केली जात आहे. २०११ पासून एलबीटी मनपा हद्दीत आहे.४मागील चार वर्षांत मनपा हद्दीत वरील उलाढालीनुसार ८०० कोटींच्या चैनीच्या वस्तू आॅनलाईन शहरात आल्या असून, त्यातून अंदाजे २० कोटी रुपयांचा एलबीटी मनपाला मिळालेला नाही. मागील तीन वर्षांत आॅनलाईन खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
आॅनलाईनचा फंडा; मनपाला २० कोटींचा गंडा
By admin | Updated: February 10, 2015 00:34 IST