फर्दापूर : छोटा टेम्पो व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना फर्दापूर-सोयगाव रस्त्यावरील वाघूर नदीच्या पुलाजवळ बुधवारी (दि. २१) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. बिलाल नजीर तडवी असे मयताचे तर निखील तडवी असे जखमीचे नाव आहे. दोघेही जालनामधील भोकरदन तालूक्यातील शेलूद येथील आहेत.
फर्दापूरवरून सोयगावकडे निघालेल्या दुचाकीला (क्र. एमएच २१ एन ६९५९) वाघूर नदीच्या पुलाजवळ छोट्या टेम्पोने (क्र. एमएच ०४ ईवाय ४५२५) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास धडक दिली. यात दुचाकीस्वार बिलाल तडवी यांना गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर निखील जालीका तडवी हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या अन्य वाहनधारकांनी पोलिसांना माहिती दिली. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोनि. प्रतापसिंह बहुरे हे घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक सुधाकर दौड, पो.कॉ. ज्ञानेश्वर सरताळे यांनी जखमीला उपचारासाठी दाखल केले.तर मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मयताच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला असून, नातेवाईक सोयगावकडे रवाना झाले आहेत. पोलिसांनी अपघातग्रस्त टेम्पो जप्त केला आहे तर चालकाला अटक केली. पुढील तपास फर्दापूर पोलीस करीत आहेत.
----
खड्ड्यांमुळेच बळी गेल्याची चर्चा
फर्दापूर ते सोयगाव या मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, रिमझिम पावसाने त्यात पाणी साचले जात आहे. त्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी मागील काही दिवसांपासून या रस्त्यावर अपघात सत्र सुरूच आहे. बुधवारी तर या खड्ड्यांमुळेच एका दुचाकीस्वाराचा बळी घेतल्याची चर्चा फर्दापुरात सुरू होती.