धर्माबाद : येथील पालिकेने नळपट्टीत वाढ केली, त्यामुळे पाणीसमस्या कमी होईल, अशी अपेक्षा धर्माबादकरांची होती, झाले उलटेच, पाणीसमस्या कमी होण्याऐवजी ती वाढलीच. सध्या शहराला एक दिवसाआड पाणी येत आहे, तेही दूषित. नगराध्यक्षांनी मात्र गोदावरी नदीतील पाणी आटल्याचा हा परिणाम असल्याचे नमूद केले.धर्माबाद शहरात २५९० वैयक्तिक व अधिकृत नळकनेक्शनधारक आहेत. शहरात सार्वजनिक नळ किती आहेत? याची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नाहीत, अनधिकृत नळांचे तर विचारुच नका. एप्रिल ते जून या दरम्यान पालिकेने दीड लाख रुपयांची वसुली केली. गतवर्षी गोदावरी नदीला भरपूर पाणी असल्याने धर्माबादकरांना दररोज पाणी मिळत होते. तेही दूषित होते. यंदा नदीचे पाणी आटल्याचे कारण सांगून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.शहरवासियांना वार्षिक नळपट्टी ८०० रुपये आकारण्यात येत होते, आता १२०० रुपये घेतले जात आहेत. एक दिवसाआड पाणी आणि १२०० रुपये नळपट्टी. याचे गणित लोकांना कळाले नाही. १२०० रुपये काय म्हणून भरायचे? असा सवाल नागरिकांचा आहे. नियमित पाणी द्या आणि त्याच पद्धतीने नळपट्टी घ्या, असे लोकांचे म्हणणे आहे. पाणीच नाही तर टॅक्स का वाढविला जातो, याचे उत्तर शहरवासियांना हवे आहे. बहुतांश ठिकाणी पाईप फुटलेले आहेत. दूषित पाणी पाईपमध्ये जाते आणि तेच पाणी शहरवासीयांना पुरविले जाते, आरोग्य विभागाने पाण्याची तपासणी करुन पाणी दूषित असल्याचा अहवाल पालिकेला दिला, मात्र पालिकेचे ढिम्म प्रशासन हलायला तयार नाही, प्रशासनाने काहीही कारवाई केली नाही. दूषित पाण्यामुळे विविध आजार बळावण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली पालिकेला साडेचार कोटी रुपये प्राप्त झाले, त्याचा उपयोग का केला जात नाही? याचे गौडबंगाल काय? हे लोकांना समजले पाहिजे. याशिवाय नळपट्टीच्या वसुलीचे काय होते? तोही पैसा कुठे जातो? याचे गणितही लोकांना कळत नाही. शहरातील बहुतांश हातपंप बंद पडलेले आहेत. हातपंपांची दुरुस्तीही केली जात नाही. नळाला पाणी येत नसल्याने शहरवासीय आता ‘फिल्टर’च्या पाण्याकडे वळले. त्याचा आर्थिक फटका लोकांना बसत आहेत. (वार्ताहर)गतवर्षी ८०० रुपये नळपट्टी, यंदा १२०० गोदावरी नदीत पाणी नसल्यामुळे शहरवासियांना एक दिवसाआड पाणी येत आहे. गोदावरी नदीत बोअर मारण्याच्या कामाला मंज़ुरी मिळाली आहे, लवकरच टेंडर निघेल- विनायकराव कुलकर्णी, नगराध्यक्षगोदावरी नदीत पाणी नाही, त्यामुळे एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. गतवर्षी ८०० रुपये नळपट्टी होती, यंदापासून नळपट्टी १२०० रुपये करण्यात आली- निलेश सुंकेवार, मुख्याधिकारी, पालिका, धर्माबादशहरातील नळ कनेक्शनमध्ये वाढ करण्यात आली, मात्र गोदावरी नदीतच पाणी नसल्याने शहराला एकदिवसाआड पाणीपुरवठा केल्याशिवाय गत्यंतर नाही- बिरप्पा मदनूरकर, सभापती, पाणीपुरवठा विभाग, धर्माबाद
एक दिवसाआड पाणी, तेही दूषित
By admin | Updated: August 2, 2014 01:08 IST