कळंब : तालुक्यातील ईटकूरसह कोठाळवाडी आणि शेळका धानोरा या तीन गावातील १४ साखळी सिमेंट बंधाऱ्यांसाठी १ कोटी ६० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार राज्याच्या जलसंधारण विभागाने सोमवारी या निधीस मंजुरी दिली आहे.कळंब तालुक्यातील ईटकूर गावाची नुकतीच जलयुक्त शिवार योजनेत निवड झाली आहे. तत्पूर्वी टँकरग्रस्त व टंचाईग्रस्त असतानाही या गावातील जलसंधारणाच्या कामांना गती मिळत नव्हती. शिवाय कृषी विभागाच्या एकात्मिक पाणलोट प्रकल्पातही गावाचा समावेश नव्हता. यामुळे टंचाईचा सामना करणाऱ्या या गावातून जलयुक्तमध्ये समावेशाची मागणी होत होती.जलयुक्त अभियानात निवड झाल्यापासून गावातील भूउपचाराची कामे मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. नुकतीच कृषी विभागाने बांधबंदिस्तीच्या पाच कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. यातच टंचाईचा सामना करत असलेल्या ईटकूर येथील साखळी सिमेंट बंधाऱ्यासाठी निधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या जलसंधारण विभागाला सादर केला होता.यानुसार ईटकूर येथील आठ साखळी सिमेंट बंधाऱ्यांसाठी ९० लक्ष रुपयाचा, शेळका धानोरा येथील ५ सिमेंट बंधाऱ्यांसाठी साठ लाख तर कोठाळवाडी येथील एका सिमेंट बंधायार्साठी दहा लक्ष रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर निधी हा अर्थसंकल्पीय तरतुदीतून होणार असून, कामे लघु संचिन विभाग करणार आहे. (वार्ताहर)
सिमेंट बंधाऱ्यासाठी दीड कोटी मंजूर
By admin | Updated: June 23, 2016 01:12 IST