शरद वाघमारे, मालेगावराष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा मोठा राबता असतो़ एखादा अपघात घडल्यास जखमींवर तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत, या हेतुने तब्बल दीड कोटी रुपये खर्चून मालेगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले़ मात्र केवळ उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण झाली नसल्याने अपघातग्रस्तांना उपचारासाठी अन्यत्र जावे लागत आहे़राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ कल्याण-निर्मल या मार्गावर मालेगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर मिळवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विशेष प्रयत्न करुन दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला़ यातून सुसज्ज आॅपरेशन थियटरसह २० खाटांचे रुग्णालय बांधण्यात आले़ युनिटमध्ये पाच विशेष तज्ज्ञ, निवासी वैद्यकीय अधिकारी, दोन शस्त्रक्रिया विभाग, बाह्यरुग्ण विभाग, क्ष-किरण आदी यंत्रणेला मंजूरी मिळाली़ जिल्ह्याला तेलंगना राज्याची सिमा लागून आहे़ मध्यवर्ती ठिकाण असल्याने सभोवतालच्या जिल्ह्यातील वाहनांचा विविध कामांसाठी नांदेडला मोठा राबता असतो़ शिवाय नागपूर, आदिलाबाद, औरंगाबाद,निजामाबाद, परभणी, हिंगोली, लातूर या मार्गावरुन सामानाची वाहतूक करणारी जड वाहने या मार्गाचा अवलंब करतात़ एखादा अपघात घडला तर मदतीसाठी वसमत फाटा येथे महामार्ग पोलिसांचे पथक अॅम्बुलंन्ससह कार्यान्वित आहे़ मात्र जखमींना उपचारादाखल करावयाचे झाल्यास नांदेडला आणण्याशिवाय पर्याय नाही़ किमान २० किमीचे अंतर पार करुन रुग्णालयात दाखल होईपर्यंत गंभीर जखमीवर मृत्यू वाटेतच ओढावतो़ मालेगाव येथे बांधण्यात आलेल्या ट्रॉमा युनिटलगतच गतवर्षी ट्रक, जीप, आॅटोच्या तिहेरी अपघातात १४ जण ठार झाले होते़ हे उदाहरण प्रतिनिधीक स्वरुपाचे असून असे अनेक लहानमोठे अपघात नित्यानेच घडतात़ अपघातातील जखमींना त्वरीत वैद्यकीय उपचार मिळाल्यास जीवीत हानी होण्याचे प्रमाण टळू शकते़ हीच बाब हेरुन मालेगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर झाले़ मात्र केवळ उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण झाली नसल्याने याचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना मिळेनासा झाला आहे़ विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी या ट्रॉमा युनिटचे उद्घाटन झाल्यास अपघातातील जखमींना मोठा दिलासा मिळणार आहे़
दीड कोटीचे ‘ट्रॉमा केअर’ उद्घाटनाअभावी धुळखात
By admin | Updated: August 18, 2014 00:33 IST