परभणी: शिक्षकदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा जिल्ह्यातील जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.शाळांमधून प्रोजेक्टर, स्क्रिन, डीश टीव्ही, रेडिओ, मोबाईलचा वापर करुन शालेय व्यवस्थापनाने हा उपक्रम साजरा केला. परभणी जिल्ह्यात शाळांची संख्या १८५३ आहे. यामध्ये ११०० जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ४८० माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, २८० खाजगी प्राथमिक, अनुदानित, विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. यापैकी १३०० शाळांमध्ये वरील उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली. साधारणत: ३ लाख विद्यार्थ्यांपैकी दीड लाख विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा लाभ घेतला.यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडून शिक्षण विभागाला लेखी सूचना प्राप्त झाल्या होत्या. शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांची बैठक घेऊन ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचे भाषण ऐकवावे, अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे शिक्षण विभागाचा दर वर्षी होणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ सकाळच्या सत्रात पार पाडला आणि दुपारी अडीचनंतर भाषण ऐकण्याचा कार्यक्रम गावोगोवी घेण्यात आला. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणी देखील हे कार्यक्रम घेण्यात आले. जेथे लाईटचा अडथळा आला त्या ठिकाणी रेडिओ संचाचा वापर केला गेला. परभणीे शहरातील बालविद्या मंदिर शिक्षण संस्थेत जवळपास २ हजार विद्यार्थ्यांनी भाषणाचा लाभ घेतला. नूतन विद्यालय, भारतीय बाल विद्या मंदिर, महात्मा फुले प्राथमिक शाळा, प्रभावती विद्यालय, सारंगस्वामी विद्यालय, गांधी विद्यालय, जि.प. कन्या शाळा, उदेश्वर विद्यालय या ठिकाणी स्क्रीनद्वारे भाषण ऐकवण्यात आले. काही शाळांनी मंगल कार्यालयाचा वापर केला तर ग्रामीण भागात मंदिरातून, समाज मंदिरात कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्यातील शिक्षकांनी देखील पंतप्रधानांच्या भाषणाचा आनंद घेतला.(प्रतिनिधी)
दीड लाख विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
By admin | Updated: September 6, 2014 00:29 IST