गंगापूर : पोलिसांनी अचानक नाकाबंदी करून अडविलेल्या कारमधून सुमारे साडेदहा लाखाचा रोकड जप्त केली आहे. मात्र ही रक्कम कुणाकडून व कशासाठी आणली याचा उलगडा अद्याप झालेला नाही. गुप्त माहितीच्या आधारे सोमवारी रात्री शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांनी अचानकपणे नाकाबंदी केली होती. यात संशयित वाहन पळून जाऊ नये म्हणून एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे संशयित पोलिसांच्या हाती लागला.
सोमवारी रात्री पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी औरंगाबादकडून वैजापूरकडे जाणारी संशयित कार गंगापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अडवत ती कार पोलीस ठाण्यात आणली. कारचे चालक व मालक प्रफुल्ल मधुकर सवई (२३, रा. वैजापूर) यांची विचारपूस कारची झाडाझडती घेतली. यादरम्यान कारमध्ये दहा लाख एक्केचाळीस हजार एकशे पन्नास रुपये मिळून आले. सदरची रक्कम कुठून आणली याबाबत सवई यांनी पोलिसांना कुठलीच माहिती दिली नाही. त्यामुळे सर्व रक्कम जप्त करण्यात आली आहे. या बाबत कायदेशीर कारवाईसाठी इन्कम टॅक्स कार्यालय औरंगाबाद यांना पत्र पाठविण्यात आले असल्याची माहिती गंगापूर पोलिसांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पो.नि. मच्छिंद्र सुरवसे, पोउनि विलास गुसिंगे, पोलीस अमलदार मनोज बेडवाल, गणेश खंडागळे, रवी लोदवाल, कैलास निंभोरकर, सोमनाथ मुरकुटे, गुंजाळ यांनी ही कारवाई केली.
---- कॅप्शन : कारमधून जप्त करण्यात आलेली रक्कम.