औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजे राज्य कर्करोग संस्थेत एम. सी.एच. सर्जिकल ऑन्कोलॉजी सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी सोमवारी पहिल्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला. आणखी २ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे शासकीय कर्करोग रुग्णालयात कर्करोगतज्ज्ञही घडणार असून, कर्करोगावरील संशोधनही सुरू होईल. त्यासोबत रुग्णांना सुपरस्पेशालिटी उपचारही मिळतील.
मराठवाडा आणि लगतच्या भागातील कर्करोग रुग्णांसाठी शासकीय कर्करोग रुग्णालय आधारवड ठरत आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडून एम. सी.एच. सर्जिकल ऑन्कोलॉजी सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमाला मंजुरी मिळाली आणि यावर्षीपासून हा अभ्यासक्रम सुरु झाला. डॉ. कुणाल विक्रम सिंग यांनी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. टाटा मेमोरीयल हॉस्पिटलचे डॉ. कैलास शर्मा यांनी या कोर्ससाठी मान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा केला. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. अनघा वरुडकर, डॉ. अजय बोराळकर, डॉ. अर्चना राठोड, डॉ. शिराज बेग यांनीही हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मेहनत घेतली. या अभ्यासक्रमामुळे संस्थेत उपचारासोबत मनुष्यबळ निर्मितीतही योगदान मिळेल.
अतिविशेषाेपचाराकडे पाऊल
या अभ्यासक्रमामुळे कर्करोग रुग्णालयाचे अतिविशेषोपचार रुग्णसेवेकडे एक पाऊल पडले आहे, असे डॉ. कानन येळीकर म्हणाल्या.
डॉ.अरविंद गायकवाड म्हणाले, राज्यात पहिल्यांदा हा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. यामुळे रुग्णालयात संशोधन सुरू होईल. रुग्णसेवेत मदत होईल. कर्करोगतज्ज्ञ होतील. ३१ डिसेंबरपर्यंत आणखी २ विद्यार्थी प्रवेश घेतील.
फाेटो ओळ..
सर्जिकल ऑन्कोलॉजी सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर. यावेळी उपस्थित डॉ.अरविंद गायकवाड,डॉ. अनघा वरुडकर,डॉ. अर्चना राठोड,डॉ. अजय बोराळकर,डॉ. सिराज बेग.