जालना : शहरातील विद्युत पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने सुरू केल्यानंतरही असंख्य दिवे बंद आहेत. ५० लाखांची तरतूद असूनही पथदिव्यांची दुरूस्ती रखडली असून परिणामी प्रमुख रस्ते अंधारातच आहेत. मात्र दुसरीकडे पालिकेने काही रस्त्यांवर एलएडी दिवे बसविण्यावर भर दिल्याने जुन्या पथदिव्यांची दुरूस्ती होणार किंवा नाही, याविषयी शंका निर्माण झाली आहे.शहरात विविध रस्त्यांवर सुमारे १४०० पथदिवे आहेत. मात्र यापैकी सुमारे एक हजार पथदिवे बंद असून त्याच्या दुरूस्तीसाठी निधीची तरतूद असतानाही दुरूस्तीच्या कामांना मुहूर्त मिळेनासा झाला आहे. महावितरणने १४ कोटींच्या वीज बिलांच्या थकबाकीपोटी गेल्या दोन वर्षांपूर्वी पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. पालिकेच्या अनेक प्रयत्नानंतर, नगराध्यक्षा पद्मा भरतिया यांच्या उपोषणानंतरही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. अखेर पालिकेने १ कोटी ८० लाखांचा भरणा केला. त्यानंतर महावितरणने अक्षय प्रकाश योजनेअंतर्गत पालिकेला वीज भरणा करण्यासाठीची सवलत देऊन हप्ते पाडून दिले व वीजपुरवठा सुरू केला. मात्र वीजपुरवठा सुरू करून देखील पालिकेचे एक हजार पथदिवे बंद असल्याने शहरातील बहुसंख्य रस्ते अंधारातच आहेत. या अंधाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पालिकेने विद्युत दिवे बसविण्यासाठी व त्याची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी जी एजन्सी नियुक्त केली, त्या एजन्सीला नियमित बिले मिळत नसल्याची पालिकेच्या आवारात चर्चा आहे. त्यामुळेच सदर एजन्सी विद्युत दिव्यांच्या दुरूस्तीला तयार होत नसल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही. याबाबत मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांना विचारणा केली असता, बंद पथदिव्यांची दुरूस्ती होणार असून त्यासाठी अपेक्षित निधीची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शहरात प्रमुख रस्त्यांवर एलएडी दिवे बसविण्यात येणार असल्याने अशा रस्त्यांवरील दिव्यांच्या दुरूस्तीपेक्षा तेथे नवीन दिवे बसविले जाणार आहेत. (प्रतिनिधी)दिव्यांची दुरूस्ती परवडेनाशहरातील पथदिव्यांच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी ३० ते ४० लाखांचा खर्च लागतो. त्यापेक्षा एलएडी दिवे बसविल्यास पाच वर्षे त्याच्या दुरूस्तीची जबाबदारी संबंधित एजन्सीवर राहते. त्यामुळे जुन्या दिव्यांच्या दुरूस्तीचा खर्च पालिकेला परवडेनासा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.दहा रस्त्यांवर लागणार एलएडीशहरातील प्रमुख रस्त्यांवर एलएडी दिवे बसविण्यावर भर देण्याचे पालिकेने ठरविले आहे. त्यानुसार १० रस्त्यांची निवड करण्यात आली असून त्यापैकी शिवाजी पुतळा ते जिजामाता प्रवेशद्वार येथे एलएडी दिवे बसविण्यात आले.
जुन्या पथदिव्यांची दुरुस्ती रखडली
By admin | Updated: June 6, 2014 01:06 IST