हणमंत गायकवाड , लातूरनूतन जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींच्या निवडी होऊन महिना उलटून गेला आहे. मात्र अद्याप या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींना शासकीय निवासस्थाने मिळू शकली नाहीत. पायउतार झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षांसह सभापतींनी शासकीय निवासस्थाने न सोडल्यामुळे नव्यांना शासकीय घरांची प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रशासनाने नव्या सभापतींना निवासस्थाने मंजूर केली. परंतु, पायउतार झालेल्या सभापतींनी घरे न सोडल्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.लातूर जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष व बांधकाम सभापती, कृषी सभापती, समाजकल्याण सभापती, महिला व बालकल्याण सभापतींच्या निवडी ४ आॅक्टोबरपूर्वी झाल्या आहेत. तब्बल एक महिना उलटून गेला आहे. मात्र पायउतार झालेले अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर, समाजकल्याण सभापती बालाजी कांबळे, कृषी सभापती चंद्रकांत मद्दे या पाच जणांनी अद्याप शासकीय निवासस्थाने सोडली नाहीत. त्यामुळे नव्या सभापतींना घरे मिळू शकली नाहीत. प्रशासनाने नव्या सभापतींच्या मागणीनुसार घरांना मंजुरी दिली. परंतु, अद्याप त्यांनी निवासस्थाने न सोडल्यामुळे नव्या सभापतींना वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. विद्यमान अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी महिला व बालकल्याण सभापती असतानाही शासकीय निवासस्थान घेतले नव्हते. आता त्या अध्यक्ष पदावर आहेत. त्यांनी जुन्या अध्यक्षांना गरज असेपर्यंत राहण्याची परवानगी दिली आहे. विद्यमान अध्यक्ष व जुन्या अध्यक्षांत निवासस्थानाबाबत सकारात्मक भूमिका आहे. परंतु, उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांना निवासस्थानाची गरज आहे. ते सध्या वडवळ येथून दररोज ये-जा करतात. उपाध्यक्ष पदावरून पायउतार झालेले अशोकराव पाटील निलंगेकर यांनी अद्याप त्यांचे निवासस्थान सोडले नसल्यामुळे नूतन उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांना गावाकडून ये-जा करावी लागत आहे. २० नोव्हेंबरपर्यंत शासकीय निवासस्थान सोडण्याचे अशोकराव पाटील यांनी मान्य केले असल्यामुळे तोपर्यंत आपण गावाकडून ये-जा करणार असल्याचे अण्णासाहेब पाटील यांनी सांगितले. माजी कृषी सभापती चंद्रकांत मद्दे यांचे निवासस्थान नूतन समाजकल्याण सभापती वेणूताई गायकवाड यांना मंजूर झाले आहे. त्यांना घराचा ताबा मिळाला आहे. परंतु, माजी सभापती मद्दे यांनी अद्याप घरातील काही साहित्य न नेल्यामुळे नूतन सभापती गायकवाड यांनी घराचा ताबा घेतला नाही. दोन दिवसांत शासकीय निवासस्थानात त्या रहायला येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जुन्या अध्यक्ष-उपाध्यक्षांचा शासकीय निवासस्थानी ‘डेरा’ !
By admin | Updated: November 7, 2014 00:42 IST