वैजापूर : तालुक्यातील सवंदगावात जलसिंचन विभागातर्फे गट क्रमांक ३९९ मध्ये पाझर तलाव बांधण्यात आला आहे. या पाझर तलावासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. या लोकांवर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला; पण हे अतिक्रमण काढण्यास संबंधित विभाग टाळाटाळ करीत आहेत. तसेच गट क्रमांक ३९९ व ४०० च्या शेतबांधावरील लोखंडी खांब काढून टाकले व झाडेसुद्धा चोरली. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सवंदगाव येथील ज्येष्ठ व्यक्ती निवृत्ती रंगनाथ सोनवणे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास ५ मे रोजी येथील शेततळ्यात जलसमाधी घेण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
सवंदगाव ते पानगव्हाण हा रस्ता क्रमांक ४१ असून, त्यावर अतिक्रमण झालेले आहे. हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या अंतर्गत येतो. मात्र, बांधकाम उपविभागाचे उपअभियंता या अतिक्रमणाच्या कारवाईबाबत टाळाटाळ करीत आहेत. याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशीही निवेदनात मागणी केली आहे.