पोलिसांनी सांगितले की, टिळकनगरातील रहिवासी स्नेहल कुलकर्णी (६३) या त्यांच्या पतीसह दत्त जयंतीनिमित्ताने मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेऊन कुलकर्णी दाम्पत्य घरी जात असताना हनुमान मंदिराजवळ दुचाकीस्वार दोन जणांपैकी एक जण त्यांच्याजवळ आला आणि कुलकर्णी कुठे राहतात, असे त्याने त्यांना विचारले. कुलकर्णी कोण असे त्या विचारत असतानाच चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. यानंतर तो साथीदारांसह दुचाकीवर बसून पळून गेला. त्यांनी आरडाओरड केली. मात्र, त्यांच्या मदतीला लोक येईपर्यंत चोरटे पसार झाले.
या घटनेची माहिती त्यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्याला कळविली. पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि गुन्हे शाखेच्या अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी सुरू केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
चौकट
महिलेच्या पतीच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले असल्यामुळे त्यांच्या डोळ्याला काळा चष्मा होता. शिवाय हे दाम्पत्य वृद्ध असल्याचे पाहून चोरट्यांनी त्यांना हेरले आणि लुटले.
==========