औरंगाबाद : महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील टीडीआर घोटाळ्यात एफआयआर दाखल करावा, असे आदेश मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सोमवारी दिले. त्यांच्या आदेशानंतरही मनपा अधिकाऱ्यांनी फौजदारी कारवाई केली नाही. अत्यावश्यक बैठकीमुळे आयुक्त मंगळवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. ते परतल्यावरच गुन्हा दाखल होईल, असा अंदाज मनपा वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी मनपा आयुक्तांनी टीडीआर घोटाळ्यात गुन्हा दाखल करावा, असे आदेश नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. २४ तास उलटल्यानंतरही सिटीचौक पोलीस ठाण्यात यासंदर्भात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई कशी करावी, असा प्रश्न मनपा अधिकाऱ्यांना पडला आहे. फौजदारी कारवाई कोणत्या आधारावर करावी, असा प्रश्नही काही अधिकाऱ्यांना पडला आहे. टीडीआर घोटाळ्यात अनियमितता झाली आहे. नियम बाजूला ठेवून कारवाई केल्याचा ठपका सहायक संचालक डी. पी. कुलकर्णी यांच्यासह तीन अधिकाऱ्यांवर आहे. विभागीय चौकशी झालेली नसताना फौजदारी कारवाई करता येऊ शकते का, यावरही मंगळवारी मनपा वर्तुळात विचारमंथन सुरू होते.
‘एफआयआर’ साठी अधिकाऱ्यांचा थरकाप
By admin | Updated: April 27, 2016 00:37 IST