उस्मानाबाद : सावकाराने लुबाडले आणि प्रशासनही कानाडोळा करीत असल्याने मागील पाच वर्षांपासून प्रशासनाकडे अर्ज, विनंत्या करणाऱ्या बिरु दुधभातेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. बिरु कार्यालयाच्या गच्चीवर दोरखंड घेऊन बसल्याचे दिसून आल्यानंतर त्याला खाली उतरविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थितांनी विनंती केली. उपजिल्हाधिकाऱ्यांनी योग्य तो न्याय देण्याची ग्वाही दिल्यानंतर अर्धा तासाचे बिरुने हे नाट्यमय आंदोलन मागे घेतले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरुन बिरुला खाली उतरविल्यानंतर त्याने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडली. लोहारा तालुक्यातील एकोंडी येथील बिरुनाथ दुधभातेच्या वडिलांनी १ लाखाचे कर्ज घेतले होते. त्याच्या बदल्यात निलंगा तालुक्यात सावकाराला त्यांनी ६३ आर जमीन लिहून दिली होती. कालांतराने त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि सावकाराने ती जमीन हडपली. सदर जमीन परत मिळावी म्हणून बिरुने सावकाराविरोधात अनेक तक्रारी केल्या. अशीच तक्रार त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी लातूर पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर निलंगा तालुक्यातील वैजिनाथ मारुती बनसोडे या सावकारावर गुन्हा दाखल झाला. मात्र बिरुला त्याची शेतजमीन काही मिळाली नाही. याच जमिनीसाठी मागील पाच वर्षांपासून तो जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहे. सावकारावर गुन्हा दाखल झाल्यानंतर वडिलांनी कर्जातील रक्कमेची परतफेड केल्याचे दिसून आले. तशा नोंदीही उपलब्ध आहेत. मात्र तरीही शेतजमीन मिळत नसल्याने मोलमजुरी करुन उपजिविका भागविणाऱ्या बिरुने पुन्हा उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यावर वैजीनाथ बनसोडे या सावकाराच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात कोरे मुद्रांक आणि बिरुच्या वडिलांनी केलेल्या व्यवहाराची कागदपत्रेदेखील सापडली. यावरुन अवैध सावकारी प्रकरणी बनसोडेवर पुन्हा गुन्हा दाखल झाला. मात्र बिरुला जमीन काही मिळाली नाही. सावकार बनसोडे याच्याकडून जमीन सोडविण्यासाठी ३ लाखाची आवश्यकता होती. यासाठी बिरुने विनोद रघुनाथ दुधभाते याला ७७ आर जमीन लिहून देवून ३ लाख ८५ हजार रुपये घेतले. हे पैसे बनसोडेला देवून त्याने जमीन सोडवून घेतली. मात्र एक जमीन सोडवून घेताना बिरुची ७७ आर जमीन पुन्हा दुसऱ्या सावकाराकडे अडकली. सदर जमीन सोडण्यासाठी विनोद दुधभाते हा ३ लाख ८५ हजार रुपयाच्या बदल्यात ८ लाखाची मागणी करीत असल्याचे बिरुचे म्हणणे आहे. याच पैशासाठी मागील पाच वर्षांपासून जमीन सावकाराच्या ताब्यात आहे. सावकारी पाशातून जमीन सोडविण्यासाठी बिरु दुधभाते मागील पाच वर्षांपासून प्रशासनाकडे हेलपाटे मारत आहे. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने हे आंदोलन केल्याचे बिरु याने निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांना सांगितले. यावेळी तहसीलदार सुभाष काकडे, नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)सावकारी पाशात अडकलेली जमीन परत मिळावी या मागणीसाठी बिरु दुधभाते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढला. तेथे असलेल्या ध्वजाच्या खांबाचा दोर हातात घेऊन त्याने आत्महत्येची धमकी दिली. परिस्थिती कमालीच्या हलाखीची आहे. दोन चिमुकल्या लेकरांना सांभाळताना नाकेनऊ येत आहेत. बायकोचं बाळंतपणसुद्धा स्वत:च्या पैशाने करु शकलो नाही. कष्टाची जमीन सावकार घशात घालून बसलाय. आणि पाच वर्ष हेलपाटे मारुनही प्रशासनाला दया येत नाही. त्यामुळे आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे बिरुने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी तो धायमोकलून रडत होता. तुझ्यावर अन्याय झाला असेल तर निश्चितपणे न्याय देऊ, त्यासाठी खाली उतरुन चर्चा कर, अशी विनंती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी केल्यानंतर अर्ध्या तासाने बिरु दुधभाते खाली उतरला.बिरु दुधभाते याच्याशी चर्चा केली असून, त्याच्याकडील कागदपत्रांची तपासणीही करण्यात आली आहे. सदर प्रकरणात त्याच्यावर अन्याय झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असून, याप्रकरणाची फेर चौकशी करण्याचे आदेश दुय्यम उपनिबंधकांना दिल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सदर सावकारावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. बिरु दुधभातेला जिल्हा प्रशासनातर्फे सहकार्य करुन त्याची जमीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असेही ते म्हणाले.
अन् बिरु चढला जिल्हाधिकारी कार्यालयावर
By admin | Updated: May 13, 2015 00:26 IST