लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : येथील दरोड्याच्या तपासात पोलिसांना यवतमाळच्या कारागृह कर्मचाऱ्याने खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. याप्रकरणी यवतमाळ येथील कारागृह कर्मचारी लिंगदेव शिखरे याच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्यांना अटकही केली आहे.दिलीप बडे (रा. शिक्षक कॉलनी, धारुर) यांच्या घरात आठ दिवसांपूर्वी दरोडा पडला होता. यात दोन लाखापेक्षा अधिक ऐवज लंपास झाला होता. यवतमाळ येथील कारागृह पोलीस कर्मचारी लिंगदेव शिखरे याने धारूर पोलिसांना आपल्या मित्राच्या भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला. दरोड्याची माहिती असल्याचे सांगून आरोपी नागपूरचे असल्याचे कळविले. शिवाय त्यांची नावेही सांगितली. दरम्यान, धारुर पोलिसांचे पथक लागोलाग नागपूरला गेले; परंतु शिखरे यांनी सांगितलेले आरोपी यापूर्वीच्या गुन्ह्यात यवतमाळ कारागृहात असल्याचे निष्पन्न झाले. धारुर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या आरोपींना धारुरच्या गुन्ह्या जाणिवपूर्वक गोवण्याचा शिखरे यांचा डाव होता, असे निष्पन्न झाले. खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन लिंगदेव शिखरेवर धारुर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.
दिशाभूल करणाऱ्या कारागृह पोलिसावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 21:44 IST