बीड : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ लेखापालाने पाऊणेदोन लाख रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्याविरूद्ध शुक्रवारी शहर ठाण्यात फसवणूक, अपहाराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.शेख अय्युब शेख साबेर असे त्या कनिष्ठ लेखापालाचे नाव आहे. जालना येथील जीवन प्राधिकरणमधून ते २०१३ मध्ये प्रतिनियुक्तीवर बीडमध्ये आले होते. १० आॅक्टोबर २०१३ ते २४ मार्च २०१४ या कालावधीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यापोटी १ लाख ७६ हजार ९७० रूपये एवढी रक्कम त्यांनी परस्पर उचलली. कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे न भरल्याने काही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावरून तपासणी केली असता तक्रारीत तथ्य आढळले. त्यानंतर सीईओ नामदेव ननावरे यांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी सहायक लेखाधिकारी हरिदास धांडे यांनी शहर ठाण्यात शेख अय्युब याच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला. (प्रतिनिधी)
अपहारप्रकरणी कनिष्ठ लेखापालाविरूद्ध गुन्हा
By admin | Updated: May 9, 2015 00:55 IST