औरंगाबाद : धनतेरसच्या दिवशी शुक्रवारी शहरात खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. बाजारपेठेत कपड्यांपासून पूजेच्या साहित्यापर्यंत खरेदीला अगदी सकाळपासून झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत दिसली. शनिवारी दिवाळीतील सर्वात महत्त्वाचे लक्ष्मीपूजन करण्याकरिता शहरवासीय सज्ज झाले आहेत.
धनतेरसनिमित्त शहरात सायंकाळी धन्वंतरी देवाचे परंपरागत पूजन करण्यात आले. विविध हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यात व घरोघरी भाविकांनी धन्वंतरीची पूजा करून निरोगी आयुष्य प्राप्तीसाठी प्रार्थना करण्यात आली. लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी शहरवासीयांत खरेदीचा उत्साह दिसून आला. धनतेरसच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे ज्वेलर्सच्या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. जालना रोडवर व लगतच्या परिसरात बड्या शोरूमबाहेर पार्किंगमध्ये चारचाकी वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरील ग्राहक येथे प्युअर सोने व दागिने खरेदी करताना दिसून आले. कोणी सोने, चांदीचे शिक्के, नाणी, खरेदी केली. सोने, तसेच पितळेच्या वस्तू खरेदी करणेही शुभ मानले जात असल्याने भांडीबाजारातही ग्राहकांची वर्दळ दिसून आली.
बाजारात सर्वाधिक गर्दी रेडिमेड कपड्यांच्या शोरूम आणि दुकानांमध्ये होती. सायंकाळी तर अक्षरशः अनेक शोरूममध्ये पाय ठेवण्यासाठीही जागा नव्हती. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या साहित्यांची मोठी विक्री झाली. यात लक्ष्मीदेवीचे फोटो फ्रेम, मूर्ती, साळीच्या लाह्या, बत्ताशे, बोळके, पणत्या, रांगोळी, अगरबत्ती आदी खरेदी केले जात होते. पाच प्रकारची फळे विकली जात होती. लक्ष्मीपूजनाच्या वेळी हिशेबाच्या वह्याचे पूजन केले जाते. याच मुहूर्तावर लाल रंगाचा वह्या ज्यावर लक्ष्मीचे छायाचित्रे असते त्यांची मोठी विक्री झाली.
झाडूची विक्रीझाडूला लक्ष्मी मानले जाते. यामुळे लक्ष्मीपूजनात झाडूचेही आवर्जून पूजन केले जाते. आज शहरात हजारो झाडू विकले गेले.
झेंडू १२० ते १५० रुपये किलो यंदा अतिवृष्टीचा फटका झेंडूलाही बसला आहे. परिणामी झेंडू आज १२० ते १५० रुपये किलोदरम्यान विकला जात होता. आडत बाजारात ८० ते १०० रुपये किलोदरम्यान झेंडू विकला गेला. दसऱ्याला झेंडू ३०० रुपयांपर्यंत विकला गेला होता.
३ लाखांपेक्षा अधिक साबण विक्रीयंदा नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन शनिवारी एकाच दिवशी आले आहे. अभ्यंगस्नान करण्यात येणार आहे. संपूर्ण अंगाला सुगंधी तेल व उटणे लावण्यात येते व नंतर सुगंधी साबण लावून स्नान करण्यात येते. यासाठी बाजारपेठेत ३ लाखांपेक्षा अधिक साबण विक्री झाले, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कंपन्यांत तयार व महिला बचत गटाने तयार केलेल्या उटण्यांना मोठी मागणी होती.
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्तशनिवार, १४ नोहेंबर रोजी पहाटे सूर्योदयआधी अभ्यंगस्नान करण्यात येणार आहे. लक्ष्मीपूजन- दुपारी ०१.५० ते ४.३० वा. सायंकाळी ०६.०० ते ०८.२५ वाजेपर्यंत व रात्री ०९.०० ते ११.२० वाजेपर्यंत.