बिलोली : येथील पालिकेच्या नगराध्यक्षपद निवडणुकीचे वेध लागले असून सत्ताधारी शहर विकास आघाडी व काँग्रेसमध्ये रस्सीखेच व फोडाफोडीची चिन्हे असून तब्बल १८ वर्षानंतर ओबीसी प्रवर्गाला नगराध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळणार आहे़ याच प्रवर्गातून पालिकेत पाच नगरसेवक असून ज्यात चार महिला सदस्या आहेत़विद्यमान नगराध्यक्षांना देण्यात आलेली मुदतवाढ राज्य शासनाने रद्द केली आहे़ त्यामुळे आता पुढच्या महिन्यात नगराध्यक्षांची मुदत संपुष्टात येणार आहे़ सन २०११-१६ या पंचवार्षिक काळातील पहिले अडीच वर्षे खुल्या प्रवर्गासाठी अध्यक्षपद होते़ आता उर्वरित अडीच वर्षाकरिता ओबीसी प्रवर्गासाठी राखीव राहणार आहे़ बिलोली पालिकेत यापूर्वी १९९६ मध्ये ओबीसीसाठी हे पद होते़ जदचे रणवीरसिंह चौहाण यांना संधी मिळाली़ आता अठरा वर्षानंतर ही संधी ओबीसी प्रवर्गाला आहे़बिलोली पालिकेत शहरविकास आघाडीला स्पष्ट बहुमत आहे़ माजी आ़ गंगाधर पटने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत शहरवासियांनी आघाडीला कौल दिला़ तर काँग्रेसचे सहा सदस्य आहेत़ १७ सदस्यात ओबीसी प्रगर्वात मोडणारे पाच सदस्य येतात़मागच्या काही दिवसांपासून आघाडीतील काही नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात आहेत़ आघाडीत फक्त निवडून येईपर्यंत संबंध होते़ तद्नंतर मात्र काँग्रेसचाच पाढा वाचत राहिले़ एकंदर बहुमतासाठी फोडाफोडी व रस्सीखेच दिसत असून आघाडीतील काही सदस्य काँग्रेसकडे गेले तर काँग्रेसचेही सदस्य राजकीय खेळी खेळू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे़ या संदर्भात विद्यमान नगराध्यक्षा जमनाबाई खंडेराय यांना विचारले असता त्या म्हणाल्या, शहरवासियांनी आघाडीला बहुमत दिले आह़े़ आघाडीचे सर्वच सदस्य एकत्रच आहेत़ आघाडीचे अध्यक्ष गंगाधर पटने जो निर्णय घेतील तोच सर्वांनी मान्य करावा व शहराचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली़ (वार्ताहर)८० वर्षीय आजीबाईही दावेदार शहरविकास आघाडीत अब्दुल बारवी, माधुरी फुलारी व फातेमाबी कुरेशी तर काँग्रेसमधून मैमुनाबेगम इनामदार व गंगुबाई फुलारी येतात़ पाच जणांमध्ये माधुरी फुलारी याच केवळ विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत़ तर दोघांचे उर्दू भाषेचे शिक्षण असून दोघे अशिक्षित आहेत़ प्रामुख्याने ऐंशी वर्षीय फातेमाबी कुरेशी या देखील दावेदार आहेत़ तर फुलारी कुटुंबात काकू व पुतणी स्पर्धेत आहेत़
ओबीसीला नगराध्यक्षपद
By admin | Updated: July 7, 2014 00:19 IST