फुलंब्री : शालेय पोषण आहारचे काम बचत गटाच्या ताब्यात देण्यासाठी तालुक्यातील मुख्याध्यापकांकडून सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे. आर्थिक नुकसान होईल, असे यामागचे कारण असल्याची चर्चा शिक्षण विभागात आहे.शालेय पोषण आहार योजनेची मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिवांनी परिपत्रक जारी करून पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी बचत गटांना देण्याचे आदेश जारी करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ते बचत गटांना देण्यात येणार होते; पण तालुक्यातील बहुतांश मुख्याध्यापकांनी आदेश पाळले नाहीत. त्यासाठी ते वेगवेगळी कारणे सांगत आहेत. गावातील बचत गटांत भांडणे लागतील, शालेय पोषण आहाराचा दर्जा घसरेल, गावात राजकारण होईल, पाणीटंचाई आहे, सरपण मिळत नाही, बचत गट भाजीपाला टाकणार नाही, अशी कारणे ते दाखवीत आहेत.वास्तविक पाहता पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी बचत गटांना दिली, तर मुख्याध्यापक निवांत राहतील. एखादी चुकीची घटना घडल्यास मुख्याध्यापकाच्या नोकरीवर गदा येणार नाही, त्यांना सामोरे जाण्याची गरज भासणार नाही. त्यांना शाळेच्या गुणवत्ता वाढीकडे अधिक लक्ष देता येईल. शासनाच्या आदेशाप्रमाणे शालेय पोषण आहार वाटपाची जबाबदारी बचत गटाकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; पण अद्याप मुख्याध्यापकांनी बचत गटाकडे जबाबदारी दिलेली नाही. या प्रकरणी आम्ही आदेश काढणार आहोत, असे शालेय पोषण आहार प्रभारी शिवाजीराव भोसले यांनी सांगितले. (वार्ताहर)एकाच मुख्याध्यापकाकडून पालनबहुतांश मुख्याध्यापक आर्थिक मोहापोटी शालेय पोषण आहाराची जबाबदारी बचत गटाकडे देण्यास तूर्त तरी तयार नाहीत. तालुक्यात धामणगाव जि.प. शाळेतील मुख्याध्यापक सुनील चिपाटे यांनी मात्र पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी बचत गटाकडे दिली आहे.
पोषण आहार बचत गटांकडे देण्यास ना
By admin | Updated: July 2, 2014 01:02 IST