खुलताबाद : विधानसभा निवडणूक, तसेच दिवाळी सण तोंडावर आला असल्याने जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पर्यटक नसल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे.वेरूळ येथे जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर असल्याने वेरूळनगरी नेहमीच पर्यटकांनी व भाविकांनी गजबजलेली असते; परंतु महाराष्ट्रात गेल्या पंधरा दिवसांपासून विधानसभा निवडणुकीच्या प्राचाराची रणधुमाळी सुरू होती. तसेच रविवारी मतमोजणी असून, त्यातच दिवाळीसण चार दिवसांवर येऊन ठेपला असल्याने सध्या वेरूळ लेणी परिसरात पर्यटकांची गर्दी नसल्याने हॉटेल, व्यावसायिक, फेरीवाले, हॉकर्सवाल्यांचे व्यवसाय थंड आहेत.खुलताबाद, वेरूळ परिसरात शेकडो हॉटेल, ढाबे व इतर व्यावसायिक येथे येणाऱ्या पर्यटक व भाविकांवर अवलंबून असल्याने या व्यावसायिकांची उपासमार होत आहे. खुलताबाद येथी भद्रा मारुती मंदिर, म्हैसमाळ येथील गिरिजा मंदिर, बालाजी मंदिर परिसरातही भाविकांची गर्दी नसल्याने पर्यटनस्थळे व धार्मिकस्थळांवर सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. दिवाळीनंतर पर्यटन हंगाम सुरू होणार असल्याने आठ दिवस तरी पर्यटनस्थळे शांत दिसणार आहेत.
वेरूळ लेणीला येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली
By admin | Updated: October 17, 2014 23:56 IST