लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतकरी हा शासनाच्या धोरणात भरडत चालला असून, त्याच्यावर यंदाही निसर्गाची अवकृपा दिसून येत आहे. त्यामुळे घरात पडलेल्या तुरी विकण्याचा प्रश्न असतानाच सध्या शेतात उभे असलेले सोयाबीनही १०० टक्के हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या पिकांचे पंचनामे करण्याच्या मागणीसाठी हत्ता मंडळातील शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले होते.आता तुरीच्या समस्येबरोबरच शेतात उभे असलेल्या सोयाबीनलाही काहीच शेंगा लागलेल्या नसल्याने हत्ता मंडळातील शेतकरी आज सोयाबीनचे डहाळे घेऊन जिल्हा कचेरीवर आले होेते. त्यामुळे उभ्या सोयाबीनसह तुरीच्याही प्रश्नावर चर्चा झाली. हत्ता मंडळात केवळ चारच पाऊस झाले तेही हलक्या स्वरुपाचे. पीक बहरात असताना पावसाने दगा दिला. त्यामुळे सोयाबीनची फुले गळून गेली. हा बहर गळत असतानाच शेवटच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीनची खुंटलेली वाढ पुन्हा सुरू झाली. मात्र आता ते नुसतेच वाढत आहे. एकाही झाडाला शेंग लागल्याचे दिसत नाही. हे पीक निव्वळ शेतात गुरे घालण्याच्या लायकीचे बनले आहे. मात्र अस्मानी संकटाचा एवढा मोठा फटका बसलेला असतानाही त्यांचे पीक चांगले असल्याचा समज करून प्रशासनाने त्याबाबत कोणतीच पावले उचलली नाहीत. शेतकºयांनी बोंब केल्यानंतर कृषि विभागाचे पाचपट्टे व सोळंके यांनी पाहणी केली.शेतकºयांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे त्यांनी शेतकºयांना सांगितले. मात्र त्यांचे पंचनामे करणे किंवा इतर बाबी आमच्या हाती काहीच नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकºयांनी आ.रामराव वडकुते, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्या कानावर जि.प.त जाऊन ही बाब घातल्यानंतर सर्व शेतकरी सोयाबीनचे डहाळे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
आता सोयाबीनचा पीकविमा पेटतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:05 IST