औरंगाबाद : ग्रामीण रस्त्याचे तुकडे करून डांबरीकरण व मजबुतीकरण कामाची कंत्राटे देण्याचा जिल्हा परिषदेचा गोरखधंदा लोकमतने उघडकीस आणला होता. त्यातून ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेची जिल्हा परिषदेने लावलेली वाताहत स्पष्ट होताच चोहोबाजूने जिल्हा परिषदेवर टीकाटिपणी झाली व कोरडेही ओढले गेले. त्यामुळे आता बांधकाम विभागाने सन २०१५-१६च्या जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा प्रस्तावित करताना सर्व कामे १० लाख रुपयांच्या पुढील घेतली आहेत.बांधकाम विभागाने जिल्हा वार्षिक योजना २०१५-१६ चा ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरणाचा कार्यक्रम प्रस्तावित केला आहे. त्यात कामाची संख्या ११३ केली आहे. सन २०१४-१५च्या आराखड्यात ही संख्या १६३ आहे.पुुढच्या वर्षीच्या आराखड्यात कामांची संख्या ५० ने कमी करण्यात आली असून रस्त्यांची लांबी २०० मीटरवरून ५०० मीटर ते १ किलोमीटरपर्यंत वाढविली आहे. २२ कोटी २१ लाख ७५ हजार रुपयांच्या या आराखड्यात ४ कोटी ९४ लाख ७५ हजार रुपये या वर्षातील अपूर्ण कामांसाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत.
आता किमान एक किलोमीटर लांबीचे रस्ते प्रस्तावित
By admin | Updated: December 15, 2014 00:49 IST