औरंगाबाद : जेवताना घास गिळण्यास त्रास होणे म्हणजे अन्ननलिकेतील त्रासाची अनेक कारणे असतात. त्यातीलच एक कारण म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर होय. परंतु हा कॅन्सर झाला म्हणजे घाबरण्याचे काही कारण नाही. वेळीच उपचार घेतल्यास त्यावर मात करता येते. उपचारासाठी बऱ्याचदा अन्ननलिका काढावी लागते. अशा परिस्थितीमुळे आता जठरापासून नवीन अन्ननलिका तयार शक्य झाले आहे. औरंगाबादेतील विभागीय शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये वर्षाकाठी अशा २० शस्त्रक्रिया करून रुग्णाला नवे आयुष्य दिले जात आहे.शहरातील विभागीय शासकीय कॅन्सर हॉस्पिटल २१ सप्टेंबर २०१२ रोजी रुग्णसेवेत दाखल झाले. तेव्हापासून कॅन्सरने ग्रस्त हजारो रुग्णांना येथील उपचारामुळे नवीन आयुष्य मिळत आहे. कॅन्सर रुग्णांसाठी पूर्वी शासन स्तरावर केवळ मुंबईमध्ये रुग्णालय होते. परंतु औरंगाबादेत कॅन्सर हॉस्पिटल सुरू झाले आणि रुग्णांसाठी ते आता आशेचा किरण ठरत आहे. विविध कॅन्सरवरील उपचार घेण्यासाठी रुग्ण कॅन्सर हॉस्पिटलला प्राधान्य देत आहेत. इतर राज्यांतील आणि विदेशी रुग्णही या हॉस्पिटलमध्ये येतात. अनेक कॅन्सरप्रमाणे अन्ननलिकेच्या कॅन्सरचे रुग्णही या ठिकाणी उपचारासाठी दाखल होतात. प्रत्येक वेळी घास गिळायला त्रास होणे म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर असू शकत नाही. त्यासाठी अनेक कारणे असतात. त्यामुळे अन्न गिळताना त्रास होत असेल तर वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. वेळीच उपचार घेतल्यास शस्त्रक्रिया करून कॅन्सरची गाठ काढून टाकली जाते. परंतु अनेकदा अन्ननलिकाच काढून टाकावी लागते. अशा वेळी जठरापासून अन्ननलिका तयार के ली जाते. ही नवीन अन्ननलिका मूळ अन्ननलिकेच्या जागी बसवून अन्न जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाते. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये वर्षभरात अशा जवळपास २० शस्त्रक्रिया होतात. अशा शस्त्रक्रियांसाठी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व डॉक्टर परिश्रम घेतात.
आता जठरापासून होते तयार नवी अन्ननलिका
By admin | Updated: July 27, 2016 00:50 IST